भुसावळ । स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून प्रवाशांनी रेल्वे स्थानकासह रेल्वेत स्वच्छता राखणे गरजेचे असून मोहिमेचा समारोप झाला असलातरी अधून-मधून पुन्हा स्वच्छता मोहिम राबवण्यात येईल, अशी माहिती डीआरएम आर.के.यादव यांनी दिली. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणकरणार्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असून लवकरच हे अतिक्रमणही हटवण्यात येणार असल्याची माहिती यादव यांनी पत्रकार परीषदेत दिली.
अस्वच्छता करणारे रडारवर
गुरुवारी डीआरएम कार्यालयात पत्रकार परीषद झाली. याप्रसंगी स्वच्छता पंधरवड्याचा समारोप झाल्याचे डीआरएम यांनी सांगत 15 दिवसात राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यादव म्हणाले की, शहरातील रेल्वेच्या परीसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे ते हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे शिवाय रेल्वेच्या कॉलनी भागातही काही बाहेरचे लोक अस्वच्छता करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. रेल्वे स्थानकावर अस्वच्छता करणार्यांना दंड केला जात असून मोहिम तीव्र करून कारवाईचा आवाका वाढवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. स्वच्छता पंधरवड्यात अस्वच्छता करणार्यांकडून 89 हजार 900 रुपये दंड वसुल झाला. रेल्वे स्थानकावरील विक्रेते रेल्वे रूळांमध्ये कचरा टाकत असल्यास कारवाई होईल, असे ते म्हणाले.
स्वच्छता शपथेने सुरुवात
स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत पंधरवडा 16 ते 31 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात आला. भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर अधिकार्यांनी निरीक्षण करीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पहिल्या दिवशी डीआरएम यादव यांनी रेल्वे कर्मचार्यांना स्वच्छतेबाबत शपथ देऊन पंधरवड्याची सुरुवात केली. अखेरच्या दिवशी 31 रोजी रेल्वे सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करीत नाटक सादर केले.