शहरातील वाढीव कर आकारणी हिताची नाही

0

नगरसेवकांनी घेतली मुख्याधिका-यांची भेट

तळेगाव दाभाडे : तळेगाव नगरपरिषदेकडून आकारण्यात आलेल्या वाढीव कर आकारणी बाबत शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांची भेट घेतली. वाढीव कर आकारणी जनतेच्या हिताची नसून यामुळे सर्वसामान्य जनतेचे नुकसान करणारी असल्याचे यावेळी मुख्याधिकार्‍यांना सांगण्यात आले. ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे व सुरेशभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी मुख्य अधिकारी वैभव आवारी यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक अरूण माने, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे,आनंद भेगडे, दिलीप राजगुरव, अशोक काकडे आदी उपस्थित होते

तीव्र आंदोलनाचा इशारा

यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांनी सांगितले की, ही कर वाढ चुकीच्या पद्धतीने केली आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत असंतोष व्यक्त केला आहे. ही आकारणी जास्त पद्धतीने केली आहे. त्यामुळे ही कर आकारणीची पद्धत बंद केली पाहिजे. नागरिकांना मोठ्या रकमेचा कर आकारण्यात आला आहे. अद्याप अनेक नागरिकांना याबाबत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या कर आकारणीबाबत मुख्याधिकार्‍यांनी याचा विचार केला पाहिजे. कर वाढीच्या चुकीच्या मुद्यांवर चर्चा करून मुख्याधिकारी यांच्याकडे याबाबत विशेष सभा बोलावून सुधारित कर प्रणाली लागू करण्याची मागणी केली. यामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. त्यांच्यावर चुकीची कर वाढ लादण्यात येत आहे. ही करवाढ कमी झाली नाही तर सर्वसामान्य जनतेसोबत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला.