शहरातील वाळूतस्करांकडून गिरणामाईचे तोडले जात आहेत लचके

0

जळगाव । जिल्ह्यातील मोठी नदी म्हणून गिरणा नदीची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेमधील दळवट या गावी गिरणानदीचे उगम होते. जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडे मार्ग बदलून गिरणा तापी नदीला मिळते. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, आणि जळगाव शहरातनजीक असलेल्या बांभोरीगावाजवळून गिरणा नदी जाते. गिरणानदीमुळे अनेक परिसर सुपिक झाले. अनेक शेती ओलीताखाली आले. जिल्ह्याला सुजलाम सफलाम करण्यात गिरणेचे मोठे योगदान आहे. मात्र बेसुमार वाळू उपसामुळे गिरणा नदी पुर्ण विद्रुप झाली आहे. वाळु तस्करी करणार्‍यांनी गिरणामाईचे वस्त्र हरण केले असून चक्क गिरणेचे लचके तोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून गिरणानदी पात्रातील बांभोरी प्र.चा.सावखेडा या दोन गटांचा वाळू लिलाव झाले आहे. ठेकेदारांकडून लिलाव झाल्यापासून दररोज प्रचंड वाळू उपसा होत आहे. दररोज दिवसभर या ठिकाणाहून वाळू उपसा होत आहे. याकडे प्रशासनाचे देखील दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. या प्रकाराची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेऊन वेळीच कारवाई करण्याची गरज आहे.

दोनशे मीटरपर्यंत वाळू उपसा करण्यास आहे बंदी
गिरणा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. वाळू उपसासंबंधी लिलाव सुरु झाल्याने ठेकेदारांकडून वाळू वाहतुक केले जात आहे. अवैधरित्या वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणात होत आहे. महसुल विभागाच्या नियमानुसार पुलापासून 200 मीटरपर्यत वाळू उपसा करता येत नाही. नियमाची पायमल्ली करुन ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात वाळू वहन केली जात आहे. दररोज 20-30 वाहनांने वाळू उपसा होत असल्याने दिवसाला 500-600 ब्रास वाळू उपसा होत आहे.

कमरे पर्यत खड्डे: गिरणा नदीपात्रातून परवानगीपेक्षा जास्त वाळू उपसा केली जात आहे. मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात असल्याने नदीपात्रात कमरेपर्यत खोल खड्डे खणले जात आहे. हेच खड्डे पावसाळ्यात भरल्याने त्यात पडून अनेक निष्पापांचे बळी जातात. तसेच पुलाच्या जवळच वाळू उत्खनन होत असल्याने भविष्यात पुलाच्या पिलरांना तडे जाऊन पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सर्व प्रकार निसर्गाच्या विरुद्ध सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अपघाताची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून गिरणानदीपात्रातील वाळू लिलाव झाला असल्याने वाळू उपसा केली जात आहे. दिवसभर मोठ्या वाहनाने वाळू उपसा केली जाते. ठेकेदारांकडून क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा तरच होतच आहे. त्यातच वाहन चालक महामार्गावरुन सुसाट वाहने घेऊन जातात. वाहनातील वाळू रस्त्यावर सांडत असल्याने मागे येणार्‍या वाहन चालकाच्या डोळ्यात वाळू उडते. त्यामुळे अपघात होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. भविष्यात होणारी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्क होणे गरजेचे असून वाळू उपसाकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.