शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिस, स्मार्ट सिटीचा ‘स्मार्ट’ उपक्रम

0

पुणे । शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून संयुक्त जनजागृती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरातील 136 ठिकाणी उभारण्यात आलेल्या डिजीटल डिस्प्लेवरून नागरिकांना वाहतूक सूचना तसेच शहरातील रस्त्यांच्या वाहतूक बदलाची आणि इतर माहिती देण्यात येणार आहे. पब्लीक अ‍ॅड्रेस सिस्टीम अंतर्गत हे डिस्प्ले बसविण्यात आले असून त्यावर जाहीराती तसेच ध्वनी प्रक्षेकाद्वारे सूचना देण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचा आधार घेत, सकाळी 9 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 7 या कालावधीत वाहतुकीच्या महत्त्वाच्या व उपयुक्त सूचना या यंत्रणेद्वारे जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी दिली.

नियंत्रणासाठी कमांड कंट्रोल सेंटर
महापालिकेने या डिस्प्लेचे नियंत्रण ठेवण्यासाठी सिंहगड रस्ता येथे कमांड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे. या डिस्प्लेवर सध्या महापालिकेच्या तसेच इतर सामाजिक योजनांच्या जाहीराती करण्यात येत आहेत. मात्र, त्याच वेळी वाहतुकी संदर्भातील सूचना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी या डिस्प्लेचा फायदा घेणे शक्य असल्याने वाहतूक पोलिस विभाग आणि स्मार्ट सिटीकडून हा संयुक्त उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर हे डिस्प्ले असल्याने नागरिकांना त्यावरील सूचना सहज दिसणे शक्य असल्याने त्याचा कोंडी फोडण्यासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

लवकरच स्मार्ट पार्किंग
बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्मार्ट पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. रस्त्यालगत आणि रस्त्याबाहेर अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची पुनरर्चना करण्यात येत असल्याने या रस्त्यांवर हे स्मार्ट पार्किंग उभारले जाणार आहे. जास्त वर्दळ नसलेल्या रस्त्यांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याने वाहनांसाठी रस्ता उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.