पिंपळेनिलखमध्ये वाहनांची तोडफोड
पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहरातील वाहन तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबेना झाले आहे. शुक्रवारी चिंचवड मोहननगर येथे अज्ञातांनी सात वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पिंपळे निलख येथे रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पिंपळे निलख येथे रस्त्यांवर आणि घरांच्या पार्किंगमध्ये उभा केलेल्या वाहनांची अज्ञातांनी शुक्रवारी मध्यरात्री तोडफोड केली. टोळक्याने सात वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी मयूर दिलीप मदने (वय 30, रा. विनायकनगर, पिंपळे निलख, सांगवी) याने फिर्याद दिली आहे.
वीज नसल्याने सीसीटीव्ही बंद
फिर्यादी मयूर यांच्यासह नागरिकांनी हरदेव कृपा इमारतीच्या वाहनतळामध्ये वाहने पार्क केली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास धारदार हत्यारे घेऊन आलेल्या टोळक्याने सात वाहनांची तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला असून परिसरात वीज नव्हती. त्यामुळे तोडफोड करणारे ‘सीसीटीव्हीत’ कैद झाले नसल्याचे, सांगवी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी सांगितले.