शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याकडे सत्ताधार्‍यांचे दुर्लक्ष : राजेंद्र जगताप

0

पिंपरी : पिंपळे गुरव, नवी सांगवी हा परिसर जास्त लोकसंख्येचा आहे. येथील लोकसंख्येचा विचार करता परिसरात सुरळीत पाणी पुरवठा होणे अपेक्षीत आहे. मात्र, ऐन हिवाळ्यातच पाण्याची बोंब झाली असून सत्ताधार्‍यांचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. नगरसेवकांच्या आश्रयाने बांधकामांना रोजरोसपणे पाणी पुरवठा केला जात आहे. ही बांधकामे वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहेत. मात्र त्यांच्यावर काहीच कारवाई केली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

खासगी बांधकामांना अनधिकृत नळजोड…

व्यावसायिक बांधकामास खासगी प्लंबरमार्फत दीड इंची अनधिकृत नळजोड रात्रीच्या वेळेस दिला जातो. उलट जे वेळेवर पाणीपट्टी भरतात त्या सोसायटींना अधिकृत नळजोड असूनही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने पाणी टँकर विकत घ्यावा लागत आहे. यासाठी नागरिकांनी वेळोवेळी स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार केली आहे. मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करत अनधिकृत नळजोडवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आयुक्त कार्यालयाबाहेर नागरिक हंडा मोर्चा काढतील, असा इशारा राजेंद्र जगताप यांनी दिला आहे.