शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, आकुर्डी, महात्मा फुलेनगर आणि चिंचवड स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. अचानक वीज जात असल्यामुळे विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. याबाबत भापकर यांनी महावितरण कंपनीच्या आकुर्डी येथील उपविभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.

अन्यथा आंदोलन छेडू
निवेदनात म्हटले आहे की, मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, आकुर्डी, महात्मा फुलेनगर आणि चिंचवड स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. सध्या उत्सव सुरू आहेत. घरगुती कामांची लगबग सुरू आहे. अचानक वीज जात असल्यामुळे विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. विजेच्या लपंडावमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. विनाकारण नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. या परिसरातील वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा. विजेचा लपंडाव असाच सुरू राहिल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारादेखील भापकर यांनी निवेदनात दिला आहे.