शहरातील शिवालयांना आले यात्रेचे स्वरुप

0

जळगाव । महाशिवरात्री हा महादेवाच्या उपासनेचे एक महत्त्वपूर्ण व्रत असलेला दिवस. या दिवशी सर्व भाविक मोठ्या भक्तीभावाने पुजा विधी करतात. दर्शनासाठी महाशिवरात्रीला शिवालयात जाऊन दर्शन घेतात. दरम्यान शुक्रवारी 24 रोजी महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांनी शहरातील विविध शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. महाशिवरात्रीनिमित्त शहरातील शिवमंदिरांना यात्रेचे स्वरुप आले होते. सकाळपासुनच शिवमंदिररात भाविकांची गर्दी दिसुन येत होती. सकाळी 4 वाजेपासुन भाविकांसाठी शहरातील शिवमंदिरे दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. सायंकाळ पर्यत भाविकांचे दर्शन सुरु होते. मंदिर संस्थान व विविध संस्थेतर्फे महाशिवरात्रीनिमित्त शहरातील व परिसरातील शिवालयांना रंगरंगोटी करण्यासह रोषणाई करण्यात आली होती. आकर्षक रोषणाईने मंदिरे उजळुन निघाली होती. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक कार्यक्रमांसह भजन, सत्संग यांसारखे संगीतमय कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

शिवलिलामृत पारायण
शहरातील नेरी नाका परिसरातील एस.टी.वर्कशॉप जवळील बारा ज्योर्तिलिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात शिवलिलामृतचे पारायण करण्यात आले. योगेश महाराज यांनी शिवलिलामृत पथन केले. 108 महिलांनी शिवलिलामृत पारायण केले. दिवसभर निरंतर जप सुरु होते. ज्ञानदेव काळे यांच्यातर्फे शिवलिलामृत पारायणाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ओंकारेश्वर मंदिरात महाआरती
शहरातील ओंकारेश्वर मंदिरात दिवस भरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 4 वाजता महाअभिषेक करण्यात आला. महाशिवरात्री निम्मिताने मंदिरावर विशेष रोषणाई करण्यात आली होती. या मध्ये एकूण पाच महाआरत्या शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्या. सकाळी पहाटे पाच वाजेपासून मदिरा मध्ये धार्मिक विधी, अभिषेकाला सुरुवात करण्यात आली.रात्री 8 ते बारा श्री सत्संग भजन मंडळा च्या वतीने शिवभजनाचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. भाविकांना अखंड महाप्रसादाचे वितारण करण्यात आले. या मध्ये महापौर नितीन लड्ढा ,महापालिका आयुक्त जीवन सोनावणे, सुनील झंवर ,रामानंद पोलीस स्टेशन चे उपपोलीस निरीक्षक चौधरी यांच्या हातून महाआरती करण्यात आली. ओंकारेश्वर मंदिर मध्ये यंदाही भक्ताचा महा मेळा भरला होता संपूर्ण मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते.

सामाजिक उपक्रमाचे आयोजन
निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिरात मुक्ती फाऊंडेशन तसचे सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून बेटी-बचोओ, बेटी-पढाओ, वृक्ष संवर्धन, कॅन्सरवर करुया मात, अवयवदान, नेत्रदान, देहदान, रक्तदान, विश्‍वशांती, व्यवसनमुक्ती आदीविषयी जनजागृती करण्यात आले. तसेच विविध शिबीराचे देखील याप्रसंगी आयोजन करण्यात आले होते.

व्यंकटेश मंदिराचा बालाजी रथ
आकाशवाणी चौकातील व्यंकटेश मंदिर संस्थांच्या वतीने बालाजी रथाचे आयोजन करण्यात आले होते. बालाजी पेठेतील बालाजी मंदिरा पासून रथाला सुरुवात करण्यात आली. या वेळी प्रमुख मान्यवर जल संपदा मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीश महाजन,महापौर नितीन लढ्ढा, माहेश्वरी समाजातील नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थति लावली होती.जळगाव शहरातील नागरिकांनी बालाजी दर्शनासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. मंदिराचे विश्वस्त श्रीकांत मणियार तसेच पदाधिकार्‍यांनी रथ उत्सवात सहभाग घेतलं होता. रथाचा मार्ग बालाजी पेठेपासून,सुभाष चौक दाना बाजार, चित्रा चौक,गुजरात स्वीटमार्ट , गोलाणी मार्केट, शिवतीर्थ, बस स्थानका पासून ते थेट आकाशवाणी चौकातील व्यंकटेश मंदिर या ठिकाणी रथाचा धार्मिक पद्धतीने समारोप करण्यात आला.

शनिपेठेत शनी मंदिरात अभिषेक
शहरातील नागरिकांचे आराध्य शनिपेठ परिसरात असलेले 156 वर्ष झालेले पुरातन शनी मंदिर आहे. याठिकाणी भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. न्याय देवता शनी यांचे गुरु भगवान महादेव आहेत. मंदिरात शनी देवाची पूजा होत असताना तेवढेच महत्व भाविकांसाठी महादेवाला आहे. आज पहाटे पाच पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सिध्देश्‍वर महादेव मंदिर
श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील बजरंग बोगद्याजवळील सिध्देश्‍वर महादेव मंदिरात महाकालेश्‍वर दर्शन आरास तयार करण्यात आले होते. या सिध्देश्‍वर महादेव संस्थात, महिला विकास संस्था, श्रीकृष्ण कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही आरास तयार करण्यात आली होती. तसेच भोईटेनगर परिसरातील सोमनाथ मंदिरात हरिओम भजनी मंडळ आणि स्वरवेध फाऊंडेशनतर्फे आया शिवरात्री का त्योहार आया हा मराठी आणि हिंदी भक्तिगितांचा कार्यक्रम गायक, कलावंत, सहकारी यांनी सादर केले. महादेवार बेलपत्र, जल, दुधाचा अभिषेक परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आला.
शिवरात्रीनिमित्त शहरात विविध ठिकाणी फराळाचे वाटप करण्यात आले. अबालवृध्दांपासून सगळ्यांनीच शिवालयात जाऊन दर्शन घेतले.

अभिषेकासाठी उसाच्या रसाची मागणी
महादेवाला प्रिय असणार्‍या उसाचा ताजा, रस पांढर्‍या शूभ्र फुलाची ची मागणी शहरातील बाजार होती. दुधाचा अभिषेक न करता नागरिकांनी महादेवाचा उसाच्या ताज्या रसाचा अभिषेक करण्यात आला. टॉवर चौक,तसेचफुले मार्केट मधील रसवंती वर नागरिकांनी उसाचा रस विकत घेण्यासाठी गर्दी केली होती.

सामुदायिक रुद्राभिषेक
शहरातील नेरी नाका परिसरातील पांझरापोळ गो-शाळेत महाशिवरात्रीनिमित्त सामुदायिक महारुद्राभिषेक व महाआरती घेण्यात आली. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी सकाळपासून प्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरातील भाविक या ठिकाणी दुग्धाभिषे करीत होते.

या ठिकाणी सकाळपासून प्रसादाचे वाटप करण्यात आले.
महिला भाविकांची यावेळी विशेष गर्दी दिसुन आली. सायंकाळी उशीरापर्यत याठिकाणी भाविकांची गर्दी दिसून आली. धार्मिक कार्यक्रमांसह संगीतमय कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.