शहरातील समस्यांवर महानगर राष्ट्रवादी काँग्रेस आता गप्प का?

0

महापौर बदलानंतर आंदोलनांत पडला खंड

जळगाव : सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा सपाटा गेल्या काही महिन्यात महानगर राष्ट्रवादीने लावला होता. मात्र महापौर बदलानंतर महानगर राष्ट्रवादीच्या आंदोलनांमध्ये खंड पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील समस्यांवर महानगर राष्ट्रवादी आता गप्प का? असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर स्वाभाविकपणे महापालिकेत एकमेव विरोधक असलेल्या शिवसेनेच्या दंडातही बळ आले आहे. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही भाजपाला एकाकी पाडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केले जात आहे. नेतृत्वाअभावी महापालिकेतील सत्ताधारी असलेले भाजपाचे सर्वच नगरसेवक सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे. नेमके काय करावे? हेच त्यांना सुचत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शहरातील समस्या, अडचणी ह्या जैसे थेच आहेत.

राष्ट्रवादीच्या आंदोलनात खंड

महानगर राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यावेळी आंदोलने केली तेव्हा महापौरपदी सीमा भोळे ह्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीसह इतरांच्या आंदोलनांना जोर होता. मात्र जानेवारीत महापौरांची पुढील कार्यकाळासाठी नव्याने निवड झाली आणि मनपाचे स्विकृत पण डॅशिंग नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे ह्या महापौर झाल्या. महापौर बदलल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा मानस होता. हा मानस लक्षात घेता महानगर राष्ट्रवादीतर्फे पक्ष कार्यालयात त्यांच्या सत्काराचेही आयोजन करण्यात आले होते. मात्र भाजपाच्या जिल्हा नेत्यांकडून आलेल्या संदेशानंतर हा कार्यक्रम रद्द झाला. आता महापौर म्हणून भारती सोनवणे यांच्या निमित्ताने प्रती महापौर म्हणून डॅशिंग नगरसेवक कैलास सोनवणे अप्रत्यक्षरित्या पदावर विराजमान आहेत. ही बाब लक्षात घेता महानगर राष्ट्रवादीच्या आंदोलनात खंड पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील समस्यांवर आता महानगर राष्ट्रवादी गप्प का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

धुळीने माखलेल्या या शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, कचर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर ढीग साचले आहे, गटारी तुडूंब भरल्या आहेत. या सर्व समस्यांचा सामना सर्वसामान्य नागरिकांना दैनंदीन करावा लागत आहे. ह्या समस्या घेऊन महानगर राष्ट्रवादीने सर्वसामान्यांसाठी विविध प्रकारची अनोखी आंदोलने केली. अगदी जळगावकरांना सहनशिलतेचे प्रमाणपत्रही वाटप केले. तरी देखिल ह्या समस्या सुटल्या नाही.

शहरातील समस्यांवर आंदोलन होणारच

गेल्या 15 दिवसांपासून संघटनात्मक बाबींवर काम सुरू आहे. पक्ष वाढविण्याचीही जबाबदारी आहेच. भारती सोनवणे महापौर झाल्यानंतर आम्ही तीन आंदोलने केली. शहरातील समस्यांवर आमची नजर असून पुढच्या काळातही सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन होणारच.

  • अभिषेक पाटील
    महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रसल.