शहरातील सहा लाख 18 हजार बालकांना रुबेला लस

0

पिंपरी चिंचवड : येत्या 27 नोव्हेंबरपासून शहरातील एकूण सहा लाख 18 हजार बालकांना रुबेला व मिझेल्स लस दिली जाणार आहे. पुढील पाच आठवडे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या वैद्यकीय विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.या बैठकीला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल के. रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज जाधव आदी उपस्थित होते.

जाहिरात बाजीतून साधणार संवाद…

शहराच्या सुमारे 22 लाख लोकसंख्येचा विचार करता, त्यामध्ये 9 महिने ते 15 वर्षे या वयोगटातील सुमारे 6 लाख 18 हजार बालके आहेत. या सर्व बालकांना ही लस दिल जाणार आहे. यामध्ये अंगणवाड्या, बालवाड्या, महापालिका शाळा, खासगी शाळा व अपंग विद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. शहरात एकूण 11 अपंग विद्यालये असून, यामधील विद्यार्थ्यांना प्राधान्याने ही लस उपलब्ध करुन देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. या लसीकरणाबाबत पालकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी जाहिरात केली जाणार आहे. याकरिता पोस्टर्स, एसएमएस, जिंगल्स, बॅनर्सच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे.

सरकारी पातळीवरील लसीकरणाबाबत पालकांच्या मनात भीती व गैरसमज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा पालकांकडून आपल्या पाल्यांना ही लस देण्यास विरोध होऊ शकतो. या पालकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या नऊ महिने ते 15 वर्षे दरम्यानच्या पाल्यांना लस देऊन, या पालकांमध्ये विश्‍वास निर्माण केला जाणार आहे.
संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका