शहरातील सोसायट्यांची पाणीपट्टी माफ करा

0

माजी विरोधी पक्षनेते तापकीर यांची मागणी

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये सध्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. त्यामुळे शहरातील सोसायट्यांची पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी आयुक्तांकडे केली आहे. तापकीर यांनी म्हटले आहे की, उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाणीप्रश्‍न बिकट झाला आहे. चिंचवड मदारसंघासह शहरातील अनेक सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. खरा उन्हाळा पुढेच आहे. त्यामुळे शहरवासीयांना येणार्‍या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार, यात शंका नाही. याला सर्वस्वी सत्ताधारी आणि प्रशासनच जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनावर टीका केली आहे.

पाण्याबाबत ढिसाळ नियोजन…
अतिशय ढिसाळ नियोजनामुळे पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. अजित पवार अगदी लहान-लहान बाबीकडे वैयक्तिक लक्ष देत होते. त्यामुळे शहराचा नियोजित विकास झाला. परंतु, सध्या शहराला कोणी वालीच राहिला नाही. सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर वचक राहिला नाही. त्यामुळे प्रशासन मोकाट सुटले आहे. अशा या नियोजन शून्य कारभाराची सजा नागरिकांना भोगावी लागत आहे. सध्या चिंचवड शहरातील सोसायट्या पैसे खर्च करून पाणी विकत घेत आहेत. त्यामुळे पाणीपट्टीचा भुर्दड त्यांना देवू नये. त्यांची सर्व पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे.