महापालिकेत विविध विकासकामांसाठी आढावा बैठक
पिंपरी-चिंचवड : शहरातील स्वच्छतेसाठीची यंत्रणा सक्षम करावी. उड्डाणपूल व मुख्य रस्त्यांच्या प्रारंभी कचरा टाकण्यात येतो. तो नियमितपणे उचलून स्वच्छता राखण्यात यावी, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेतील आढावा बैठकीत अधिकार्यांना दिली. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणार्या अनधिकृत टपर्या, हातगाड्या व अतिक्रमण विषयक कामकाज सक्षमतेने करण्यासाठी क्षेत्रीय अधिकार्यांकडील हे काम अनधिकृत बांधकाम नियंत्रण व बांधकाम परवानगी विभागाकडे देण्यात यावे, असेही सांगितले.या बैठकीत स्वच्छता, अतिक्रमणांसह विविध विकासकामांचा अधिकार्यांकडून आढावा घेतला. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता राजन पाटील, रवींद्र दुधेकर, अय्युबखान पठाण यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
बेवारस वाहनांचे सर्व्हेक्षण करा
शहरातील मुख्य रस्त्यांवरील प्रत्येक एका किलोमीटर अंतरावर नागरिकांसाठी ई-टॉयलेट सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. त्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून अथवा महापालिकेकडून ही कार्यवाही करण्याबाबत नियोजन करावे. यशवंतराव चव्हाण रूग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी शहरातील इतर दवाखान्यातील ओपीडी सेवा सक्षम करण्याचे नियोजन करावे. सर्व चौकातील लेफ्ट टर्न फ्री केल्यास वाहतूक सुरळीत होईल. त्यासाठी नियोजन करावे. रस्त्यांवर बेवारस वाहने पडलेली आहेत. त्यावर कार्यवाही करण्यात यावी. येत्या दहा दिवसात सर्व क्षेत्रीय अधिकार्यांनी अशा वाहनांचे सर्व्हेक्षण करून अहवाल द्यावा. त्याबाबत पोलीस आयुक्तांना कळविण्यात यावे.
शाळांसाठी एकच रंग हवा
शहरातील व्यायामशाळा, स्विमिंग पूल इत्यादीमधून खेळाडू घडविण्यासाठी महापालिकेमार्फत प्रयत्न करण्यात यावेत. मनपाच्या शाळा व इमारतीसाठी स्वतंत्र रंग संगती निश्चित करून इमारतींना रंग द्यावेत. नव्याने बांधण्यात येणार्या इमारतींना अथवा मनपा इमारतीची कामे सुरु असणार्या ठिकाणी त्याचा अवलंब करावा. व त्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिल्या. महापालिकेच्या वाचनलयांबाबतही त्यांनी सूचना केल्या.
शहरातील बेवारस वाहने पोलिसांच्या सह्याने उचलण्यात येणार आहेत. शहरातील पदपथांवर थांबण्या-या हातगाड्यांवर कारवाई करावी. कचरा वहनामध्ये सुधारणा करण्यात यावी. पुणे, चाकण या परिसरातून येणारे नागरिक पुलावरुन पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत कचरा टाकत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. मोकळ्या जागेत देखील कचरा टाकला जातो. अशा मोकळा जागा बंदिस्त कराव्यात. शहरातील अनधिकृत फलक काढावेत, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिल्या आहे. त्याची आम्ही अंमलबाजवाणी करणार आहोत, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.