जळगाव : शहरातील मोठ्याप्रमाणात नागरिकांनी लसीकरण करुन घेतले असून ९३ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ६५ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १५ ते १७ वयोगटातील तरुणांचा देखील उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
देशात सध्या कोरोनाच्या रुग्णामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत असून नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून कोरोनाची तिसरी लाट उंबठ्यावर आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनासह महानगरपालिकेची वैद्यकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे. येणारी लाट थोपविण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेकडून टेस्टींगची संख्या वाढविण्यात आली असून कोविड सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच लसीकरण कसे जास्तीत जास्त करण्यात येईल यासाठी मनपाच्या दवाखाना विभागाकडून नियोजन सुरु आहे.
शहरात आतापर्यंत ३ लाख ४२ हजार १३५ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, २ लाख ३२ हजार ३७५ हजार नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच २६ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतल्यानंतर ते दुसऱ्या डोस साठी पात्र ठरले असून त्यांनी लवकरात लवकर दुसरा डोस घ्यावा, व ज्या नागरिकांनी अद्याप पहिला डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांनी तातडीने पहिला डोस घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त शाम गोसावी व महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांनी केले आहे.
मनपाचे कोविड सेंटर सज्ज
जळगाव शहरातील ५ लाख ७४ हजार ५०७ हजार नागरिकांपैकी साडे तीन लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तसेच उर्वरीत नागरिकांचे देखील लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करण्यासाठी मनपाचा दवाखाना विभाग परिश्रम घेत आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर मनपाचा दवाखाना विभागाने कोविड केअर सेंटर सज्ज केले असून रुग्ण वाढताच कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे.