शहरातील 1 हजार 300 टन कचरा उचलला

0

पुणे । वैभवशाली गणेशोत्सव विर्सजन मिरवणूक संपल्यानंतर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी अवघ्या दोन ते तीन तासांच्या कालावधीतच रस्ते आणि विर्सजन घाट चकाचक केले. यामध्ये निर्माल्य 601 टन आणि संपूर्ण शहरात 1 हजार 300 टन कचरा गोळा करण्यात आला. शहराच्या मध्यवस्तीतील मुख्य घाटांसह उपनगरांत तब्बल 50 ते 60 घाटांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व घाटावर निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. यामध्ये 601 टन निर्माल्य गोळा करण्यात आले. लक्ष्मी, टिळक, कुमठेकर, केळकर या प्रमुख विर्सजन मार्गावर सुमारे 40 टन कचरा निर्माण झाला होता.

हौदामध्ये 2 लाख 22 हजार गणेशमूर्तींचे विर्सजन
शहरातून वाहणार्‍या मुळा आणि मुठा नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन यांमुळे हौदामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन पालिकेने केले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तब्बल एक लाख 46 हजार 496 गणेश मूर्तीचे हौदात तर टाक्यांमध्ये 72 हजार गणेश मूर्तीचे विर्सजन करण्यात आले. हौद आणि टाक्यामध्ये एकूण 2 लाख 22 हजार 164 गणेश मूर्ती विसर्जीत करण्यात आल्या. कॅनॉलमध्ये 73 हजार गणेश मूर्तीचे, नदीपात्रात 88 हजार गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. याप्रकारे एकूण चार लाख 16 हजार गणेश मूर्तीचे विर्सजन करण्यात आले. तब्बल दोन हजार 873 गणेश मूर्ती दान करण्यात आल्या.

पाण्याचा बाटल्या व प्लॅस्टिकच्या पिशव्या
अन्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. त्यात पाण्याचा बाटल्या, खाद्यपदार्थाच्या आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या याचा समावेश सर्वाधिक होता. पालिकेच्या सुमारे तीन हजार कर्मचार्‍यांनी अवघ्या दोन ते तीन तासांत विर्सजन मार्गाचे रस्ते चकाचक केले. शहरात एक हजार 300 टन कचरा गोळा करण्यात आला, असे पालिकेचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले.