शहरातील 60 टक्के महिला आरोग्याबाबत निष्काळजी

0

मुंबई :- हल्ली भारतात काम करणाऱ्या महिला किती असे म्हटले तर जवळजवळ 80 टक्के महिला कामा निमित्त बाहेर पडतात असे म्हणायला हरकत नाही. पण या 80 टक्के महिलांमधील किती महिला आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेतात? पण तसे न होता हल्ली भारतीय महिलांमध्ये स्वत:च्या आरोग्याबाबत असलेली अनास्था. ही त्यांनी कमजोर करत चालली आहे आणि याचे महिलांना भान नाही.

शहरातील ६० टक्के महिला या आपल्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करतात असे गेल्या २ वर्षात मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे. या सर्वेक्षणामध्ये मुंबई -मीरा रोड , ठाणे व पालघर येथील दोन हजाराहून अधिक महिलांचे मत विचारात घेण्यात आले होते. या सर्वेक्षणात सुमारे ६१ टक्के महिला आरोग्याच्या दृष्टीने सकस आहाराबाबत अनभिज्ञ आहेत. उर्वरित ३९ टक्के महिलां त्यातून किमान चौरस आहार, तसेच जेवण तयार करण्याच्या पद्धतीमध्ये म्हणजेच तेल -तूप व मसाले वापरासंबंधी सजग असल्याचे सांगतात. ४० टक्के महिलांना दरवर्षी आरोग्य तपासणी करावयाची असते हेच माहित नव्हते, ताप आल्यावर फक्त रक्ताची तपासणी म्हणजे आरोग्य तपासणी करणे असे मत या महिलांनी व्यक्त केले. व्यायाम व चालणे या संदर्भात महिलांचे मत जाणून घेतले असता ५० टक्के महिला व्यायाम करीत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्यामध्ये अनियमितता असून कुटूंबाला प्रथम प्राधान्य देत असल्यामुळे बऱ्याच वेळा व्यायामाला दांडी होते. कामावर जाणाऱ्या महिलांमध्ये फक्त २० टक्के महिला रोज जिमला जात असून व्यायाम न करण्यामागे रोजच्या प्रवासाला लागणारा वेळ हे महत्वाचे कारण समोर आले आहे. कामावर जात असलेल्या महिलांमध्ये मानसिक ताण तणावाची ठळक लक्षणे दिसून आली आहेत .

याविषयी अधिक माहिती देताना मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी म्हणाले, “कुटुंबाचा आधार असलेली स्त्री तिच्या आरोग्याच्या बाबतीत उदासीन असल्याचे वास्तव आहे. कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक बांधणी असलेली उत्कृष्ट दिनचर्या अभावानेच आजच्या भारतातील महिलांकडे दिसून येते.आपल्या देशात हळूहळू कर्करोगाची जागरूकता वाढत आहे परंतु नियमित तपासण्या करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण तुलनेने कमीच आहे. नियमित तपासणी केल्यास कॅन्सरचे निदान लवकर होण्यास मदत होईल.

दरवर्षी 1 हाख महिलांना कॅन्सर
भारतात प्रत्येक वर्षी १ लाख २२ हजार ८४४ महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर झाल्याचे निदान होते. दरवर्षी ८० हजारहून अधिक महिलांचा या कॅन्सरमुळे मृत्यू होतो.स्तनाच्या कर्करोगामुळे भारतात मृत्यूमुखी झालेल्या महिलांची संख्या जगभरात सर्वात जास्त आहे. भारता खालोखाल चीन आणि अमेरिकेत स्तनाच्या कर्करोगाने महिलांचा मृत्यू होतो अशी माहिती वोक्हार्ट हॉस्पिटलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.

ठळक निरीक्षणे:
सुमारे ६१ टक्के महिला आरोग्याच्या बाबतीत उदासिन
३९ टक्के महिला आहाराबाबत सजग
४० टक्के महिलांमध्ये वार्षिक आरोग्य तपासणी बाबत अनास्था
५० टक्के महिलांचा व्यायामाला प्राधान्य परंतु अनियमता
कामावर जाणाऱ्या फक्त २० टक्के महिला करतात व्यायाम