नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 6 हजार पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा खडा पहारा
पुणे : 31 डिसेंबर ते 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत शहरात तब्बल 6 हजार पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा खडा बंदोबस्त असणार आहे. पोलीस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. नागरिकांनी मद्यप्राशन करून वाहने चालवू नयेत, तसेच वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत. तुमच्यामुळे कोणालाही दुखापत किंवा दु:ख पोहचणार नाही, अशा प्रकारे वाहन चालवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षी पोलिसांनी राबवलेल्या उपक्रम आणि नवीन वर्षात नागरिकांच्या पोलिसांकडून असलेल्या अपेक्षांबाबत चर्चा करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
20 ठिकाणी नाकाबंदी
शहरात 20 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून एकूण 240 ब्रिथ अॅनालायजरद्वारे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच पार्टीचे आयोजन करणार्यांनी स्पीकरची परवानगी घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी व्हॉटस् अॅपवर सूचना कराव्यात, सूचनांचा अभ्यास करून उपाययोजना राबविणार, पुढच्या वर्षात गुन्ह्यांची संख्या कमी करणार, कोअर पोलिसिंग, नागरिकांसोबत संबंध सुधारणार, वाहतुकीचे नियम पाळावे, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
हेल्मेट सक्तीबाबत मौन
हेल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वारांवर सध्या कारवाई सुरू आहे आणि ती नवीन वर्षातही सुरूच राहणार आहे, अशी स्पष्ट भूमिका पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी घेतली आहे. नवर्षापासून हेल्मेटसक्तीचे सुतोवाच मध्यंतरी त्यांनी केले होते. यामुळे शहरातील विविध संघटना व नागरिकांकडून विरोध सुरू झाला होता. यावर त्यांनी सक्तीबाबत मौन बाळगत कारवाईवरची भूमिका ठाम असल्याचे सांगितले.
नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन
नवीन वर्षात गुन्ह्याचे प्रमाण, वाहतूक कोंडीची समस्या कमी व्हावी, महिला सुरक्षा तसेच इतर गोष्टीसाठी काय करता येईल, यासाठी नागरिकांनी व्हॉटस् अॅपवर सूचना कराव्यात. याचा अभ्यास करून यावर काय उपाय काढता येतील, याचा विचार करण्यात येणार असल्याचे डॉ. व्यंकटेशम यांनी सांगितले. पुढच्या वर्षात गुन्ह्यांची संख्या कमी करून लोकांचा विश्वास मिळवायचा आहे. यामुळे नागरिकांनी अधिकाअधिक सूचना करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
तंत्रज्ञानाचा वापर वाढविणार
गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नववर्षात तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यात येणार आहे. यासाठी सीसीटीव्ही, ब्रिथ अॅनालायजर आदींचा उपयोग करण्यात येणार आहे. कोअर पोलिसिंग, नागरिकांसोबत चांगले संबंध, सामाजिक तसेच संस्थेकडून सूचना मागवून त्यावर काम करता येणार आहे. सध्या काही सूचना आल्या आहेत. यात गुन्हा नियंत्रण, महिला सुरक्षा, वाहतूक व महाविद्यालयीन युवकांच्या समस्यांचा समावेश आहे. शहरातील ब्लॅक स्पॉटचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असून हे कमी करण्यासाठी काम सुरू आहे. गेल्या वर्षी 8 हजार 111 अपघात झाले आहे. पुढील वर्षी हे कमी करायचे आहेत.