जळगाव। ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज, शुक्रवारी सकाळी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून साजरा होणार्या गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून खरेदीसाठी शहरातील बाजारपेठ आणि गणेशमूर्तीचे प्रमुख ठिकाण असलेली टॉवर चौक, घाणेकर चौक तसेच अंजिठा चौफुली व गणेश कॉलनी गर्दीने फुलली आहे. त्यातच गणरायाचे आगमन होताच वातावरण आनंदी होते. बाप्पांच्या स्वागताला गणेशभक़्त सज्ज झाले आहेत. त्यासाठी उत्सवाला लागणारे सजावटीचे साहित्य, नवनवीन रंगीबेरंगी मखर, लाईटींग तसेच पुजाविधीच्या वस्तुंची दुकाने ठिकठिकाणी गणेशभक्तांनी गजबजली आहेत. तसेच शहरात अमळनेर, चोपडा, भुसावळ तसेच पुणे, मुंबई येथील ढोल पथक जळगावात ठाणमांडून आहेत हे विशेष.
बाजारात मोठी उलाढाल
शहरात बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू असून गणपतीच्या मूर्तीची विक्री करणारे शेकडो स्टॉल लागले आहेत. शहरात टॉवर चौक ते घाणेकर चौकपायृात आज सकाळपासून गणपतीच्या मूर्ती नेणार्यांची गर्दी दिसून आली. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवडयाचे पान, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना आज चांगली मागणी होती. प्रसादासाठी साखरफुटाणे, बत्तासे, पेढे, मोदक यांचीही खरेदी सुरू झाली असून प्रसाद साहित्याचीही मोठी उलाढाल बाजारात सुरू आहे. गणरायांच्या आगमनाची लगबग आज घरोघरी सुरू आहे. शुक्रवारी सकाळी गणपतीची प्रतिष्ठापना असल्यामुळे सकाळपासूनच घरोघरी प्रतिष्ठापना करणार्या गणेशमूर्ती शहरातून मूर्ती वाजत गाजत नेल्या जात होत्या.
मृर्ती खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
शहरात मोठ्या उत्साहात गणपतीची तयारी सुरू झाली आहे. शहरातील बाजारपेठेसह प्रमुख मार्गावरील रस्त्यांवर दुकानांवर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज गणरायाचे आगमन होत असल्याने शहरातील बाजारपेठेत सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. व्यावसायिकांनी टॉवर चौक, घाणेकर चौक, फुले मार्केट, गणेश कॉलनी, पिंप्राळा, खोटेनगर, शिवकॉलनी, अंजिठा चौक तसेच प्रभात चौक परिसरात दुकाने थाटली आहेत. यात सजावटीसाठी रंगीबेरंगी थर्माकॉलचे मखर, चमकी आदींचा समावेश आहे. सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गणपतीच्या देखाव्यांची तयारी अद्याप सुरू असून मंडळांचे कार्यकर्ते दंग आहेत. गणेशाच्या आगमनासाठी मोठा उत्साह संचारल्याने शहरात छोटे-मोठे मिळून 300 पेक्षा अधिक मंडळात गणपती स्थापना करण्यात येणार आहे. तर सार्वजनिक गणपती मंडळाकडून विविध प्रकारच्या आरास व सजीव सादर करण्यात येणार असल्याचे समजते. बाजारपेठेत यंदा गणपतीच्या जय मल्हार, बाहूबली या गणेशमूर्तींना भाविकांकडून मोठी मागणी होत आहे. तसेच शहर पोलिस ठाण्यासमोर मुर्ती खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमणात गर्दी केली होती.
असा असणार पोलिस बंदोबस्त
शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी 2350 सार्वजनिक व खाजगी मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यातच जिल्ह्यात 94 एक गाव एक गणपतीचीही स्थापना होईल. तर काही ठिकाणी 3, 5, 7 व 9 दिवस बाप्पाची स्थापना केली जावून विसर्जन केले जाते. त्यामुळे जिल्हा पोलिस दलातर्फे तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यात एक पोलिस अधीक्षक, 2 अपर पोलिस अधीक्षक, 10 पोलिस उपअधीक्षक, 200 पोलिस अधिकारी, 3 हजार 400 पोलिस कर्मचारी, 1200 होमगार्ड, 8 आरसीपी प्लाटून, 2 क्युआरटी प्लॉटून, 3 एसआरपीएफख 8 इआरटी प्लॉटून, 5 स्ट्रॉयकिंग फोर्स तसेच साध्या गणवेशातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी राहणार आहेत. पोलिस प्रशासनातर्फे गणेश उत्सव व बकरी ईदनिमित्त जिल्ह्यातील 1800 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर एमपीडीएची कारवाई देखील प्रस्तापित आहे. विशेष म्हणजे यंदा पोलिस प्रशासनातर्फे वाहतुक नियंत्रण करून होणार्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे ड्रोन कॅमेराचा वापर केला जाणार आहे.
पोलिस दलातर्फे बक्षीस
यंदा पोलिस प्रशासनातर्फे प्रत्येकी पोलिस स्टेशनप्रमाणे चार बक्षीसांचे आयोजन केले गेले आहे. तर गणेश मंडळांना आव्हानात्मक सुचनांच्या सीड्या देखील देण्यात आलेल्या आहेत. गणेश मंडळांच्या चेकींग करता आरएफआयडी वापर करण्यात येणार असून पोलिस कर्मचारी गणेश मंडळांना भेटी देवून पाहणी करतील. विसर्जन मिरवणुक मार्गावर दरवर्षीप्रमाणे या वर्षीय सीसीटीवी बसविण्यात आले असून यातून मिरवणुकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर महानगरपालिकेतर्फे निर्माल रथही गणेश मंडळांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासोबतच विसर्जन सोयीस्कर व्हावे यासाठी सात के्रनची व्यवस्था देखील मनपातर्फे करण्यात आली आहे. गणेश उत्सव व बकरी ईद दरम्यान व्हॉट्स, फेसबुक तसेच व्टिटरवर आलेल्या अफवा पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्यांवर पोलिस प्रशासनाच्या सायबर सेल विभागाचे विशेष लक्ष असणार आहे.
मंदिरांवर आकर्षक रोषणाई
बाजारपेठेत नंदुरबार, नाशिक, अमरावती, आणि धुळे जिल्ह्यातील मुर्तीकांराकडून विक्रीसाठी दाखल झाल्या आहे. साधारण 21 रूपयांपासून 1 लाखांपर्यंत किंमतीच्या निरनिराळया गणेशमूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. याचबरोबर सजावटीसाठी विविध आकारातील मखर अर्थात मंदिरांना व आकर्षक आसनांना ग्राहकांकडून मागणी आहे. त्याची किंमत 200 रूपयांपासुन 1 हजारांपर्यंत आहे. तर रंगीबेरंगी पट्टया, जिलेटीन कागद, पताका, गोंडे, चक्र, पन्नी, विदयुत रोषणाई आदी सजावटीचे साहित्य देखील बाजारात उपलब्ध आहे. गणपतीच्या पुजा विधीसाठी धुप, अगरबत्ती, मद्रा आणि प्रसादासाठी उकडीचे मोदक देखील उपलब्ध आहेत.