शहरात आणखी 1493 कॅमेरे

0

नवी मुंबई । बेलापूर मतदार संघाच्या भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शहरात 1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला होता. त्यांचा हा प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता आहे असे मंदाताई म्हात्रे यांनी सोमवारी बेलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

नवी मुंबईतील नागरिकांच्या व महिलांच्या सुरक्षततेसाठी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरातल्या महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी 1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे यासाठी मंदा म्हात्रे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याची राज्य शासनाकडून दखल घेण्यात आली असता एकूण 1493 सीसीटीव्ही लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

सीबीडीत असलेल्या महापौर निवासस्थानावर कोणाचीही नजर नसल्याने त्या ठिकाणी कोण येते व कोण जाते याचा काही थांगपत्ता लागत नव्हता. त्यासाठी आता त्या ठिकाणीही 2 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याने त्या ठिकाणी कोण येते व कोण जाते यांची इत्यंभूत माहिती पालिका प्रशासनाला मिळणार आहे. महापौर निवासस्थाचा वापर महापौर ऐवजी न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे या निवासस्थानाचा वापर फक्त महापौर यांच्यासाठीच व्हावा अशी मागणी जोर धरू लागली होती. त्याच वेळी या प्रकारावर तिसरा डोळा तैनात करावा यासाठी मंदा म्हात्रे यांनी आवर्जून या ठिकाणी 2 सीसीटीव्ही कॅमेर्‍याची मागणी केली आणि ती मंजूरही झाली. त्यामुळे आता मनपाच्या महापौर निवासस्थावर महापौर ऐवजी कोण कोण येऊन राहते याची माहिती तत्काळ मिळणार आहे.

नवी मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी लागणार कॅमेरे
हे सीसीटीव्ही कॅमेरे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको प्रशासन व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने शहरातील शाळा, महाविद्यालये, उद्याने, तलाव, बस डेपो, रेल्वे स्टेशन परिसर, सोसायटीत जाणार्‍या चौकात, शासकीय कार्यालये, हॉटेल परिसर, बाजार, चौक व इतर सार्वजनिक ठिकाणी हे कॅमेरे बसवले जाणार आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, चैन चोरी, दरोडा, महिला वर्ग, मुली व जेष्ठ नागरिकांना या वाढत्या गुन्हेगारीचा त्रासापासून मुक्तता मिळावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी सांगितले.