शहरात आता ‘पे अ‍ॅण्ड पार्क’

0

राष्ट्रवादीचा विरोध नोंदवून महापालिकेत मान्यता
पिंपरी-चिंचवड : पुण्याच्या धर्तीवर आता पिंपरी-चिंचवड शहरातही वाहनांसाठी सशुल्क पार्किंग (पे अ‍ॅण्ड पार्क) असणार आहे. याबाबतच्या धोरणाला महासभेने मंजुरी दिली आहे. दरम्यान, पार्किंग पॉलिसीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध नोंदविला होता. परंतु, त्यांचा विरोध नोंदवून महासभेने मान्यता दिली. तसेच वाहनतळाची जिथे आरक्षणे आहेत. त्या ठिकाणचे 25 टक्के दर उपसूचनेसह कमी केले आहेत. मे महिन्याची तहकूब सभा शुक्रवारी झाली. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत.

जागा आणि वाहन प्रकारावर दर
वाहतूक नियंत्रण, इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि त्यामुळे होणारे वैयक्तिक फायदे यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सशुल्क पार्किंग धोरण तयार केले आहे. त्यासाठी पार्किंगच्या जागांचे आणि वाहनांचेही वर्गीकरण करत दरपत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. गावठाण भाग आणि झोपडपट्टींना यातून वगळण्यात आले आहे. पार्किंग सुविधेचा वापर करण्यास नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी मासिक पास उपलब्ध करुन देण्याची तरतूद धोरणामध्ये आहे. तर सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षा थांबे यांना सशुल्क पार्किंगमधून सवलत देण्यात आली आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा अवलंब करत महापालिका ’पार्किंग अ‍ॅप’ विकसित करणार आहे.

शहराचे केले तीन विभाग
पार्कींग मागणीनुसार पार्कींग शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यानुसार, शहर तीन झोनमध्ये विभागण्यात आले आहे. शहरात ज्या ठिकाणी दिवसभर 80 ते 100 टक्के पार्कीगची आवश्यकता आहे, असे ठिकाण झोन ’अ’ (उच्च पार्कींग), ज्या ठिकाणी वाहन पार्क करण्याचे प्रमाण 60 ते 80 टक्के आहे, असे ठिकाण झोन ’ब’ (मध्यम पार्कींग), ज्या ठिकाणी 40 ते 60 टक्के पार्कींगचे प्रमाण आहे, असे ठिकाण झोन ‘क’ (कमी पार्कींग) आणि ज्या ठिकाणी वाहने पार्क करण्याचे प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे ठिकाण झोन ‘ड’ (कमीत कमी पार्कींग) म्हणून घोषीत करण्यात येणार आहे.

सायकल, रुग्णवाहिकांना वगळले
सद्यस्थितीत झोन ‘ड’ पार्कींग धोरणातून वगळण्यात आले आहे. रस्त्यावरील पार्कींगसाठी झोन ’अ’ मधील रस्त्यांवर एका मोटारीसाठी 1 ईसीएसकरिता दहा रूपये प्रति तास आकारण्यात येणार आहेत. निवासी पार्कींगसाठी रात्री अकरा ते सकाळी आठ यावेळेत 25 रूपये प्रतिदिननुसार नऊ हजार 325 रूपयांचा वार्षिक परवाना देण्यात येणार आहे. त्यानुसार, पार्कीग दर ठरविण्यात आले आहेत. मात्र, सायकल, रूग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षा थांबे यांना शुल्कातून सवलत मिळणार आहे. याबाबतच्या धोरणाला महासभेने मंजुरी दिली.