शहरात खासगी ट्रॅव्हल्सकडून बेशिस्त पार्किंग

0

पोलिस आयुक्तांना पत्र; पार्किंग समस्येमुळे नागरिकांचा वाहतूककोंडी, अपघाताशी सामना

नियंत्रण आणण्याची आमदार लक्ष्मण जगतापांकडून मागणी

पिंपरी ः पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख रस्त्यांवरील खासगी ट्रॅव्हल्स वाहनांची अवैध वाहतूक व पार्किंग समस्येमुळे नागरिकांना वाहतूककोंडी आणि अपघातांना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांना कडक शब्दांत पत्र लिहीले आहे. यापूर्वीच्या पोलिस आयुक्तांनी खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहतूक आणि पार्किंगसाठी काही नियम बनवून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर वाहतूक विभागाने या नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आमदार जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल्सची बेशिस्त पार्किंग आणि असुरक्षित वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका व वाहतूक पोलिसांच्या संयुक्त समन्वयाने योग्य कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी पोलिस आयुक्तांना केली आहे.

खासगी ट्रॅव्हर्ल्सधारकांकडून रस्त्यांवर मक्तेदारी…
पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख रस्त्यांवर बेशिस्तपणे आणि वाहनांना अडथळा ठरेल अशा पद्धतीने खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असतात. या खासगी ट्रॅव्हल्सधारकांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर आपली मक्तेदारी निर्माण केलेली आहे. नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान, भोसरी, निगडी, चिंचवड स्टेशन, काळेवाडी, वाकड अशा सर्वच भागात ही परिस्थिती दिसून येत आहे. महत्त्वाचे रस्ते, प्रमुख चौक, वर्दळीचे रस्ते, अंतर्गत मोठ्या रस्त्यांचा अर्ध्याहून अधिक भाग या खासगी ट्रॅव्हल्सनी व्यापलेला असतो.

वाहतुक पोलीस विभागाची नियमावली…
वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता मनाला वाटेल त्या पद्धतीने या ट्रॅव्हल्स रस्त्यांवर उभ्या राहतात. त्यामुळे वाहतूकोंडीसोबतच इतर वाहनांना अडथळा आणि अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अनेक वाहनधारकांना अपघात सुद्धा झालेले आहेत. यासंदर्भात यापूर्वीच्या पोलिस आयुक्तांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी वाहतूक पोलिस विभागासोबत बैठक घेऊन शहरात खासगी ट्रॅव्हल्स उभे करण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले होते. ट्रॅव्हल्स आणि अवजड वाहनांना शहरात येण्यासाठी ठराविक वेळेत बंदी घालण्यात आली होती. तसेच शहराच्या काही भागात सायंकाळी प्रवेश करण्यास ट्रॅव्हल्सना बंदी घालण्यात आली होती. त्यावर अंमलबजावणी सुरू झाल्याने खासगी ट्रॅव्हल्सचे बेशिस्त पार्किंग आणि असुरक्षित वाहतुकीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले होते.

पोलीस विभाागाचे वाहतुक सुरक्षेकडे दुर्लक्ष…
परंतु, यापूर्वीच्या पोलिस आयुक्तांच्या बदलीनंतर शहरात पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाहतूक पोलिस विभागाने या समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्‍या पिंपरी-चिंचवडसाठी खासगी ट्रॅव्हल्सधारकांची बेशिस्त पार्किंग आणि असुरक्षित वाहतूक भूषणावह नाही. ही समस्या पोलिस आयुक्त म्हणून तुम्ही योग्य रितीने सोडविणे आवश्यक आहे. शहरातील महामार्ग अथवा मोकळ्या जागांमध्ये खासगी ट्रॅव्हल्सची पार्किंगची व्यवस्था करून शहरातील रस्ते वाहतूककोंडी आणि अपघातांपासून मुक्त करत वाहनधारकांना दिलासा द्यावा. बेशिस्त पार्किंग व असुरक्षित वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त समन्वयाने योग्य कार्यवाही कार्यवाही करावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.