शहरात गणपती विसर्जनाला तगडा पोलीस बंदोबस्त

0

पोलीस अधिकारी- कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द; अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे

पिंपरी चिंचवड : गणपती बाप्पाची मनोभावी पूजा केल्यानंतर त्यांना निरोप देण्याची वेळ दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 973 सार्वजनिक गणपती मंडळ आपल्या गणपती बाप्पांना निरोप देणार आहेत. यावेळी मोठ्या उत्साहात गणपती मंडळ मिरवणुका काढणार आहेत. या उत्सवात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या गणपती विसर्जन घाटांवर चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी सर्व कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या सुट्ट्या रद्द केल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.

अडीच हजार पोलीस तैनात….
गणपती विसर्जनासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त असून शहरातील ऐकून 973 सार्वजनिक गणपती मंडळ बाप्पाचं विसर्जन करणार आहेत. यावर्षी थेरगाव घाट, पिंपरी घाट अश्या वेगवेगळ्या गणपती विसर्जन घाटावर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात बाहेरून आलेल्या 05 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 30 पोलीस उपनिरीक्षक, 15 सहायक पोलिस निरीक्षक, 1 हजार होमगार्ड, एस.आर.पी.एफ ची एक कंपनी तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील जवळपास 2 हजार 500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी गणपती विसर्जनाच्या वेळी तैनात असणार आहेत. याचबरोबर पोलीस मित्र आणि नागरीक पोलीस पोलीस मित्र असे मिळवून 250 जण नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. गणपती उत्सव हा शांततेत, चांगल्या प्रकारे साजरा होईल. मंडळांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि शिस्तबद्ध मिरवणुका असाव्यात, असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले आहे.

विसर्जन मिरवणुकीसाठी सुमारे 219 स्वयंसेवक सज्ज
संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने विविध संस्था, संघटना, महिला बचत गट आणि नागरिकांना एकत्रित घेऊन गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्त ठेवण्यासाठी मदत केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विसर्जन मिरवणुकीसाठी सुमारे 219 स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. यामध्ये विविध महिला बचत गट महाविद्यालय आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान संपूर्ण अकरा दिवस चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेकडो स्वयंसेवक नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असतात. दुपारी चार ते रात्री दहापर्यंत स्वयंसेवक वाहतूक बंदोबस्त विसर्जन घाटावर आणि जीवरक्षक म्हणून कार्य करतात. यामुळे पोलिस महापालिका आणि अग्निशमन विवाहाला यांची मोठी मदत होते. या वर्षी 150 स्वयंसेवक विशेष पोलीस अधिकारी म्हणून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबत काम करणार आहेत.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग…

यावर्षी महिला बचत गटाचे 135 सभासद आणि डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 80 विद्यार्थी या मोहिमेत सहभाग घेणार आहेत. चापेकर चौकापासून ते थेरगाव पूल, बिर्ला हॉस्पिटल, रोडवरील घाट, मोरया गोसावी मंदिर घाटापर्यंत स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. चिंचवड स्टेशन चौक ते चापेकर चौक या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी देखील स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. तर चार स्वयंसेवक चिंचवड घाटावर जीव रक्षक म्हणून काम करणार आहेत. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राम जाधव, चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.