शहरात चोर्‍या वाढल्या

0

पुणे । शहरात गेल्या काही दिवसांपासून चोर्‍या आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. डेक्कन, समर्थ आणि बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

क्वॉर्टर गेट चौकातील बॉम्बे रेक्झीन हे दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील 6 लाख रुपये चोरून नेले आहेत. हा प्रकार बुधवार (13 सप्टेंबर) रात्री 10 नंतर घडला. याप्रकरणी आदीदीन मोहम्मद राजकोटवाला (वय 41, रा. सॅलिसबरी पार्क) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकूचा धाक दाखवून लुटले
दुसरा प्रकार बालगंधर्व पोलीस चौकीसमोरील पुरंदर लेनमध्ये घडला. अजिंक्य गोगावले (वय 32) हे गंधर्व अपार्टमेंटमध्ये गाडी पार्क करत असताना दोघा अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरून नेली. याप्रकरणी त्यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अन्य एका चोरीची घटना बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून चोरट्यांनी एका कार्यालयातील काही ऐवज चोरून नेला आहे.