शहरात डायलेसिस सेंटरला मंजुरी

0

पुणे । मित्रमंडळ चौकातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात डायलेसिस सेंटर चालविण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पूना नेत्र प्रतिष्ठानसोबत दहा वर्षांसाठी करार करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत डायलेसिससाठी प्रतिरुग्ण ४०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे, तर पालिकेच्या शहरी गरीब योजनेचे कार्ड असलेल्या रुग्णांना अवघ्या २०० रुपयांमध्ये डायलेसिस करता येणार आहे.

शहरातील किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना डायलेसिसचे उपचार घ्यावे लागतात. ही सेवा अत्यंत महागडी असल्याने आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांना हे उपचार परवडत नाहीत. त्या पार्श्‍वभूमीवर लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मदतीने महापालिकेच्या वतीने कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये अवघ्या ४०० रुपयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तसेच पालिकेच्या शहरी-गरीब योजनेचे कार्ड असलेल्या पेशंटला अवघ्या २०० रुपयांमध्ये डायलिसिस करता येते. बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात प्रतिष्ठानच्या वतीने डायलेसिस प्रकल्प चालविण्यासाठी करार करण्यात यावा, असे पत्र महेश लडकत आणि योगेश समेळ यांनी दिले होते. स्थायी समितीने आरोग्य विभागाकडे अभिप्राय मागितला होता.

१० वर्षांसाठी करार
त्यावर डायलेसिस सेंटर चालविण्यासाठी प्रतिष्ठानसोबत दहा वर्षांसाठी करार करण्यात यावा, या प्रकल्पासाठी बाळासाहेब ठाकरे दवाखान्यातील १५०० चौरस फूट जागा विनामोबदला उपलब्ध करून देण्यात यावी, आवश्यक असलेले तज्ज्ञ, डॉक्टर, तंत्रज्ञ तसेच इतर कर्मचारी वर्ग हा लायन्स क्लबच्या वतीने उपलब्ध करून देण्यात यावा, असा सकारात्मक अभिप्राय आरोग्य विभागाने दिला त्यानंतर सोमवारी हा प्रस्ताव स्थायी समिती पुढे ठेवण्यात आला त्याला मंजुरी देण्यात आली आहे.