आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांची माहिती
पिंपरी-चिंचवड : गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पुस्तकांशिवाय खंडित होऊ नये, यासाठी शहरात दहा ठिकाणी पुस्तक पेढी योजना राबविणार असल्याची माहिती आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी दिली. संत तुकारामनगर येथील सोहम लायब्ररी येथे आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या पहिल्या पुस्तक पेढीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. इयत्ता आठवी ते पदवीपर्यंतच्या मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तकपेढी संत तुकारामनगरात सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक श्याम लांडे, सुलक्षणा धर, डॉ. अशोक शिलवंत, किरण सुवर्णा आदी उपस्थित होते.
पुस्तक पेढी सर्वांसाठी
आमदार चाबुकस्वार पुढे म्हणाले की, ही पुस्तक पेढी सर्वांसाठी असून, लायब्ररीतही तुम्ही बसून अभ्यास करू शकता. घरीदेखील पुस्तके घेऊन जाण्याची सुविधा करण्यात आली आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाची सर्व प्रकारची पुस्तके आता विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सोहम लायब्ररीचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले. तर प्रदीप बोरसे यांनी आभार मानले.