पारंपरिक वेशभूषेत फिरतेय तरूणाई
पिंपरी : एका तालात थिरकणारे पाय दांडियाच्या अन् कानावर पडणार्या संगीताच्या तालावर घुमणारे विविधरंगी घागरे आणि रास गरब्यांच्या रंगांबरोबर रंगलेली तरुणाई असा नवरात्रोत्सवाचा जल्लोष सध्या पिंपरी-चिंचवड परिसरात पहायला मिळत आहे. शहरातील मंडळासह परिसरातील अनेक मंडळांमध्ये दांडिया, रास गरब्याची रंगत वाढत आहे. सायंकाळी सात वाजल्यापासून शहरातील नवरात्रोत्सव मंडळाच्या ठिकाणी युवक-युवतींसह महिला वर्ग दांडिया खेळण्यासाठी, तसेच गरबा नृत्य करण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याने नवरात्रोत्सवाची रंगत वाढली आहे. दांडिया व गरबा खेळण्यासाठी गर्दी व्हावी यासाठी मंडळांतर्फे पाककला, डान्स, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यात बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सार्यांना रोख रक्कम, तसेच चषक स्वरूपात पारितोषिक दिले जाणार आहे.
परिसरातील काही मंडळांकडून देवीच्या आरतीसाठी राजकीय तसेच महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित केले जात आहे. यासोबत आकर्षक स्वागत कमानी, तसेच विद्युत रोषणाई केल्याने मंडपाच्या आजूबाजूचा परिसर रोषणाईने उजळला आहे. डोली तारो ढोल बाजे, पंखिडा ओ पंखिडा अशा एकापेक्षा एक पारंपरिक गीतांच्या तालावर तरुणाई नृत्याविष्कार सादर करण्यात हरखून गेली होती. सात वर्षांच्या मुलींपासून 70 वर्षांच्या आजींपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमात ताल धरला. येथील दांडियासाठी अनेकांनी महिनाभरापासून तयारी केली होती. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या दांडियात मुलींनी दोडिया, दोन ताली, गरबा बेसिक, बरोडा स्टाइल गरबा इत्यादी प्रकार सादर केले. दांडियामध्ये तीन स्टेप्स पारंपरिक ताराबिना श्याम, सनेडा, डोलिडा या गाण्यांवर लहान-मोठ्यांनी नृत्य सादर केले. ढम ढम ढोल बाजे बाजे रे ढोल बाजे ढम ढम, राइट लेफ्ट राइट टर्न करीत नृत्याचा आविष्कार सुरू होता. दोडिया, एकमारी, दोमारी, हीच, डिस्को दांडिया अशी वैविध्यता त्यांच्या नृत्यात होती. ढोली तारो ढोल बाजे, रंगीलो मारो ढोलना, देसी बीट, सनेडा आदींच्या तालावर तरुणाई भान हरपून नाचताना दिसून आली.