शहरात दिवसाआड साफसफाई

0

पुणे । स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्‍या पुणे शहरात दिवसाआड साफसफाई केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यंदाच्या पालिकेच्या अंदाजपत्रकात साफसफाईसाठी कमी निधी ठेवल्यामुळे निधीची कमतरता जाणवत आहे. त्यातच ठेकेदाराकडील साफसफाई कामगारांचा तीन महिन्यांपासून पगारच झालेला नाही. त्याचा फटका देखील सफाई कामाला बसत असून त्यामुळे शहरात दिवसाआड सफाई करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्याची निवड झाली. विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे दिवास्वप्न दाखविण्यात आले. पण पालिकेच्या बजेटमध्ये पंधरा क्षेत्रीय कार्यालयासाठी 45 कोटींची तरतूद करणे अपेक्षित होते. मात्र साफसफाई करण्यासाठी बजेटमध्ये अवघी 17 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यानंतर वर्गीकरण आणि सह यादीद्वारे निधी देऊन तो 30 कोटीपर्यंत गेला आहे. तरीही अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत क्षेत्रीय कार्यालयाकडील झाडण हद्दीतील कामे आउट सोर्सिंगने करण्यासाठी सातत्याने वर्गीकरण करण्याची वेळ आली आहे. काही नगरसेवकांनी स्वतःसह यादीतील विविध कामाचे पैसे साफसफाईच्या कामासाठी वर्गीकरणाद्वारे दिले आहेत. पण हा निधीही कमी पडत आहे.

त्यातच ठेकेदाराकडील साफसफाई कामगारांचा गेल्या तीन महिन्यापासून पगार झालेला नाही. त्यामुळे अनेक कामगार कामावरच येत नाही. त्यामुळे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसाआड साफसफाई केली जात आहे. त्याचा फटका साफसफाईच्या कामांना बसला आहे. केंद्र सरकार देशात स्वच्छ भारत योजना राबवित आहे. मात्र, स्मार्ट सिटी असा लौकीक मिळविणार्‍या शहरामध्ये अस्वच्छता दिसत आहे. या कामासाठी बजेटमध्येच निधी नसल्यामुळे नगरसेवक हैराण झाले आहेत. त्यातून पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नमुना उघडकीस आला आहे.