शहरात दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांकडून घरफोडी; पोलिसात गुन्हा दाखल

0

जळगाव : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोन्याचांदीसह रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. यात पहिल्या घटनेत हिराशिवा कॉलनीत उन्हाळ्याचा उकाडा जाणवत असल्याने परिवारासह सर्व जण गच्चीवर झोपायला गेल्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चॅनलगेटचे कुलूप तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त करुन 73 हजारांचे ऐवज लंपास केल्याचे सकाळी 5 च्या सुमारास उघडकीस आले. तर दुसर्‍या घटनेत कानळदा रोडवरील भगवती नगरात मध्यरात्री कुटुंबीय झोपलेले असतांना लॉकर तोडत रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 52 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली.

कुटुंबिय झोपायला गेले गच्चीवर; चोराचा ताव कपाटावर
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुल सखाराम सुर्यवंशी(वय 34, रा.हिराशिवा कॉलनी) हे आपल्या पत्नीसह आई-वडिल व बहिण सोबत राहतात. बहिण वर्षा दीपक फुलपगारे या 15 दिवसांपासून भावाच्या साखरपुड्यासाठी घरी आल्या होत्या. 12 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत परिवारासह सर्वांनी गप्पागोष्टी केल्या. उकाडा जाणवत असल्यामुळे सर्वजण रात्री गच्चीवर झोपायला गेले. त्यावेळी मात्र खालच्या घरात कोणीही झोपलेले नव्हते. नेहमीप्रमाणे राहुल सुर्यवंशी यांच्या आई पहाटे 5 वा. प्रात:विधीसाठी खाली असता घराचा दरवाजा उघडा व चॅनेल गेट तुटलेले दिसले. तर घरातील सामान पूर्णपणे अस्ताव्यस्त करुन कपाट ठेवलेले 63 हजारांची रोकड, 1 ग्रॅम वजनाची सोन्याची 2500 रु.ची.अंगठी, 1200 रु.च्या चांदीच्या पायल, मोबाईल अनुक्रमे 2000, 3000, 1500 असा एकूण 73 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी रात्री 10.30 ते 5.00 वाजेपूर्वी घराचे कुलूप तोडत आत प्रवेश करुन चोरीस गेल्याचे उघडकीस आले. राहुल सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन तालुका पो.स्टे.ला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काका गेले झोपायला अन् मुलगी उठली अभ्यासाला
कानळदा रोडवरील भगवती नगरात मध्यरात्री कुटुंबीय झोपलेले असतांना लॉकर तोडत रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 52 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हेमंत जगन्नाथ परदेशी (वय 44, रा.भगवती नगर) हे आपल्या परिवारासह 10.30 पर्यंत जेवण करत झोपले. तर त्यांचा भाऊ अनिल परदेशी हा रात्री 2 च्या सुमारास झोपले. हेमंत परदेशी यांची मुलगी सलोनी ही सकाळी 4 वाजता अभ्यासासाठी उठली असता पुढील दरवाजा व बाथरुमच्या दरवाज्याला दोरी बांधलेली होती. त्यानंतर तिने वडिलांना उठवत बाहेरील दोन्ही दरवाजे बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर आजीच्या रुममध्ये गेले असता आजीच्या रुममध्ये असलेला लॉकर तोडलेला दिसला. त्या लॉकरमध्ये 2 ग्रॅमची 3000 रु.चे पेंडल, 10000 रु.रोख, 38500 रु.च्या दोन चैन, 500 रु.ची चांदीची लक्ष्मी असा एकूण 52 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे उघडकीस आले. हेमंत परदेशी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला.