जळगाव । पतंगोत्सवात मांजा वापरल्याने मानवी जीवनाला धोका उद्भवत आहे. हा मांजा अनेकांना जायबंदी करणारा ठरत असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यासाठी दबाव वाढत आहे. प्रशासनाने मात्र त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले नाही. दरम्यान, नॉयलॉनच्या दोराला बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री होत आहे. बाजारात उपलब्ध मांजामध्येदेखील नॉयलॉनचा वापर होत असल्याचे बोलले जात आहे. जळगावात मकरसंक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो. अवघ्या एक दिवसांवर हा उत्सव येऊन ठेपल्याने तयारीला वेग आला आहे.
मांजा बंदीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
पतंग उडविताना मांजा महत्त्वाचा घटक असतो. जेवढा मजबूत मांजा तेवढा पतंग उडविण्याचा आनंद अधिक असतो. शिवाय प्रतिस्पर्धांची पतंग कापण्यासाठीदेखील अशा मांजाची गरज असते. त्यामुळे मजबूत व धारधार मांजाची मागणी युवकांकडून होत आहे. मांजा अनेकांच्या जीवावर उठला आहे. तुटून खाली पडला किंवा कशात अडकलेला मांजा मानवी शरीराच्या संपर्कात येऊन जखमी होण्याचे प्रमाण वाढते. मांजावर बंदी आणावी अशी मागणी राष्ट्रवादी कोँग्रेस पक्षाने जिल्ह्याधिकार्यांकडे केली आहे.
विविध आकारातील पतंग
यंदा पारंपरिक पतंगासह आकार व प्रकारातील पतंग बाजारात आलेले आहेत. नरेंद्र मोदी, छोटा भिम, मोटू पतलू, बेन 10 यांचे चित्र असलेले पतंग बाजारात विक्रीसाठी आलेले आहेत. लहान मुलांचा मोटु पतलू, बेन 10 ची पतंगाला मोठ्या प्रमाणात मागणीआहे. विविध आकारातील पतंगदेखील युवकांना भुरळ घालत आहेत. यंदा पतंगांवर काटरून्सचे विविध पात्र तर आहेतच. राजकीय व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दोन वर्षांप्रमाणेच स्थान अढळ ठेवले आहे.
पारंपारिक मांजा झाला कालबाह्य
पारंपरिक मांजा बनविण्यासाठी कारागिरांकडे गर्दी वाढली आहे. मांजा तयार करण्याचीही एक खास पद्धत व शैली आहे. त्यासाठी बाजारातून चक्री व दोरा कारागिरांकडे द्यावा लागतो. कारागीर लाख, काचेचा चुरा आणि इतर साहित्याची खेळ तयार करून ती या मांजाला लावत असतो. किमान तीन ते पाच हजार वार याप्रमाणे तो बनविला जातो. मांजा इलेक्ट्रीक मशिनद्वारे भरण्याचे काम केले जाते. सध्या मांजा बनवून घेण्याकडे देखील तरुणांचा कल वाढला आहे. कार्टुन चित्र असलेल्या पतंगांना लहान मुलांकडून मोठ्याप्रमाणात मागणी आहे.