पुणे । गेले आठवडाभर शहरात उकाडा वाढला होता. 30 अंशाच्यावर पारा गेल्याने लोक हैराण झाले होते. परंतु शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास शहरात पावसाच्या चांगल्या सरी पडल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. येत्या दोन तीन दिवसात पुणे आणि परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून राज्यात ही मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
1 जूनपासून शहरात 603 मिमी पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात उष्णतेचा पारा 32 अंशावर गेला होता. शुक्रवारी सकाळपासूनच आकाशात काळे ढग दाटून आले होते. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. तर काही काळ वाहतूक कोंडीचा सामना नागरीकांना करावा लागला. शहरात काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे गटारे तुंबली होती. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. साधारण अर्धा तास पावसाच्या जोरदार सरी झाल्यामुळे उकाडा कमी झाला. साधारण अर्ध्या तासानंतर आभाळ मोकळे झाले. शहरवासीयांनी पावसाचा आनंद लुटला.