शहरात पावसाचे दमदार ‘कमबॅक’

0

पिंपरी-चिंचवड : प्रदीर्घ काळाच्या विश्रांतीनंतर पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्हाभरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात काल (शनिवारी) रात्रीपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली असून, रविवारी सकाळी पावसाचा जोर चांगलाच वाढला. पावसाच्या पुनरागमनाने नागरिक, शेतकरी सुखावले आहेत. मुसळधार पावसाबाबत गेल्या दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. तो खरा ठरताना दिसत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नक्षत्र बदलल्यानंतर पावसाचे आगमन झाले आहे. येत्या शुक्रवारपासून गणरायांचे आगमन होणार आहे; त्यामुळे पाऊस आता दीर्घकाळासाठी मुक्कामी थांबण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मावळ तालुक्यातील गावांसह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरले असून, पावसाचा जोर पाहता धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

पावसाची जोरदार बॅटिंग
गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जूनमध्ये पडलेला पाऊसही अपुरा वाटत होता. मात्र, मागील 24 तासात पावसाने ही कमी भरून काढली आहे. पवना धरण परिसरातही रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 22 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातही सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. रविवार असल्यामुळे नागरिक सकाळपासूनच पावसाचा आनंद लुटत होते.

पिकांना पुन्हा उभारी
मावळ परिसरात पाण्याअभावी पिकांनी माना टाकल्या होत्या. मात्र, पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पिकांनी उभारी घेतली आहे. पावसाच्या आगमनाने मावळातील बळीराजाही सुखावला आहे. पावसाच्या कमबॅकने सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. पुणे वेधशाळेचा अंदाज हा अचूक ठरला असून, येत्या 25 ऑगस्टपर्यंत परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

‘पवना’ धरणातून 3636 क्युसेसने विसर्ग
पवना धरण 100 टक्के भरले असून, पावसाचा जोर सुरू असल्याने रविवारी दुपारी एक वाजेपासून धरणाचे चार दरवाजे अर्धा फुटाने उघडण्यात आले. त्यातून सुरुवातीला 2900 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर पाहता हा विसर्ग पुढे 3636 क्युसेसपर्यंत वाढविण्यात आला. पवना नदी आधीच दुथडी भरून वाहत आहे. त्यातच धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना, वस्त्यांना सावधगिरी बाळगण्याचा सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली.