शहरात प्रत्येक वार्डात शेतकरी आठवडा बाजार सुरू व्हावेत

0

कोथरूड । शेतकर्‍यांना त्यांच्या मेहनतीने पिकवलेल्या भाजीपाला, फळे-फुले धान्य व इतर मालांसाठी योग्य भाव मिळाला पाहिजे. यासाठी संपूर्ण शहरात प्रत्येक वार्डात असे शेतकरी आठवडा बाजार सुरू केले जावेत अशी सूचना बुधाजीराव मुळीक यांनी केली. तसेच या बाजारात मालाचे वर्णन असणारे पत्रक ही ग्राहकांना दिले जावे असेही ते म्हणाले.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि मयुर पवार यांच्या विंग्रो फार्मर प्रोडयुसर कंपनी यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 13मधील सहवास सोसायटी भागात आयोजित केलेल्या शेतकरी आठवडा बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, दीपक पोटे, शिरीष भुजबळ, पुनीत जोशी, बापूसाहेब मेंगडे, प्रशांत हरसुले, बाळासाहेब धनवे, शुभांगी सुदामे, अनुराधा एडके, प्रवीण जोशी, जगदीश डिंगरे, शरद लेले, अक्षय सुदामे, संगीता आदवडे, प्रमिला फाले, माणिक दीक्षीत, शिवराज शिंदे, छाया सोनावणे, श्री राळेरासकर व या भागातील नागरिक उपस्थित होते.

सहवास सोसायटीत बाजार
हा बाजार दर शनिवारी सहवास सोसायटी समोरील भुजबळ यांच्या जागेत पेरूच्या बागेजवळ भरणार असून त्यात विविध शेतमाल रास्त दरात उपलब्ध होणार आहे. यावेळी पोटे व सहस्रबुद्धे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले. मयुर पवार यांनी आभार मानले.

प्रभागातील दुसरा आठवडा बाजार
सप्टेंबर महिन्यात पटवर्धन बाग येथे सुरू केलेल्या आठवडा बाजारास प्रचंड प्रतिसाद मिळाला व हा बाजार यशस्वी झाल्यानंतर आता प्रभागात दुसरा आठवडा बाजार सुरू करताना मनस्वी आनंद होत असून शेतकरी बांधवांना त्यांच्या मालास थेट ग्राहकांना विकता येत असल्याने रास्त दर मिळत आहे याचे समाधान लाभत आहे असे या बाजाराच्या संयोजिका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. पुढील काळात प्रभागात अन्यत्र आणि कोथरूडच्या विविध भागातही असे बाजार सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.