शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट!

0

पुणे (माधुरी सरवणकर) । शहरात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून पुणे महापालिकेकडे मात्र बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी नसल्याची बाब समोर आली आहे. मनुष्यबळ नसल्याने बोगस डॉक्टर शोधण्यासाठी अडचणी येत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली. सध्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढलेले असताना बोगस डॉक्टरांमुळे रूग्णांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती वर्तविण्यात येत आहे. अशाप्रकारची एखादी घटना घडल्यानंतर महापलिका प्रशासन जागे होणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

रूग्णांच्या आरोग्यासह जीवही धोक्यात
कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी तसेच परवाना नसताना अनेक बोगस डॉक्टर शहरात कार्यरत आहेत. सध्या शहरात ताप, खोकला, सर्दी, स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकुणगुनियासारख्या आजारांनी नागरीक त्रस्त आहेत. अनेक बोगस डॉक्टर बाहेर गावांहून येऊन शहर व आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील नामवंत डॉक्टरांच्या हाताखाली दोन ते तीन वर्षे कम्पाउंडरची नोकरी केल्यानंतर हेच कम्पाउंडर शहरात वा गावात जाऊन डॉक्टरी व्यवसाय सुरू करतात. काही डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेले; परंतु नियमानुसार आवश्यक प्रमाणापत्र नसताना वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातून आर्थिक कमाई चांगली होत असली, तरी अशा बोगस डॉक्टरांकडे उपचार केल्याने गोरगरीब रुग्णांचे आरोग्यासह जीवही धोक्यात येत आहे. अनेकदा चूकीचे उपचार केल्याने रुग्णांना विपरीत समस्यांना तोंड द्यावे लागते.

11 बोगस डॉक्टर सापडले
यासंदर्भात नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकार्‍याने जनशक्तिशी बोलताना माहिती दिली की, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एका वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती केल्यास बोगस डॉक्टरांचा शोध घेणे सोपे होईल. 2014 मध्ये 11 बोगस डॉक्टर शोधण्यात महापालिकेला यश आले होते. कारण त्यावेळी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक वैद्यकीय अधिकारी कार्यरत होता. मात्र आता फक्त 4 वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यास ही संख्या अपुरी पडत आहे.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात वैद्यकीय अधिकारी हवा
शहरातील बोगस डॉक्टरांना चाप लावण्यासाठी कारवाईचा बडगा उचलण्याची शोधमोहिम पालिकेतर्फे सुरू करण्यात आली होती. त्याअंर्तगत शहरामध्ये 2013 मध्ये 3, 2014 मध्ये 11, 2015 मध्ये 7, 2016 मध्ये 2 तर 2017 मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत एका बोगस डॉक्टरवर पालिकेने एफआयआर दाखल केली आहे. सध्या शहरात 4 झोनमध्ये प्रत्येकी 1 वैद्यकीय अधिकारी आहे. मात्र शहरातील 17 क्षेत्रीय कार्यालयात एकाही क्षेत्रीय वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांच्याकडे 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र साबणे यांनी अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.