मुंबई: देशात सध्या कोरोन मुळे भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं येस बँकेवर घातलेले निर्बंध यामुळे सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२०० अंकांनी घसरला, तर निफ्टी ४०० अंकांनी खाली घसरला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. जवळपास ८० देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. याचा परिणाम जगातल्या महत्त्वाच्या शेअर बाजारांमध्ये दिसू लागला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात, अशी भीती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली. त्यानंतर अमेरिकेन शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही पाहायला मिळत आहे. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सकाळच्या सुमारास मोठी पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारात उलाढाल सुरू होताच सेन्सेक्स ८५६. ६५ अंकांनी घसरला. पुढे सेन्सेक्स १,४५० अंकांनी खाली गेला. तर निफ्टीमध्ये ३ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.
जगभरात कोरोनामुळे शेअर बाजारात पडझड होत असताना भारतीय शेअर बाजारांना दुहेरी फटका बसला. आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काल निर्बंध घातले. त्याचा परिणाम शेअर बाजाराचं कामकाज सुरू होताच दिसला. येस बँकेचा शेअर तब्बल ३० टक्क्यांनी घसरला. याशिवाय इतरही शेअर्स घसरले.