जळगाव । महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सोमवार 7 मे पासून मेगा अतिक्रमण निर्मूलन मोहीम महिनाभर राबविली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन विभाग अधीक्षक एच.एम. खान यांनी दिली. रस्त्यांवर विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. यामुळे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्तासह महापालिका कर्मचारी, मक्तेदारांच्या कर्मचार्यांचे पथक तयार केले जात आहे. महापालिकेस आलेल्या तक्रारींची जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी दखल घेत शहरात मेगा अतिक्रमण मोहीम राबविण्याची सूचना दिली आहे.
6 महिन्यापुर्वीची केलेली कारवाई जैसे थे
अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सहा महिन्यांपूर्वी प्रमुख बाजारपेठेत अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली होती. पुन्हा सहा महिन्यांत विक्रेत्यांनी बाजारपेठेत, तर काहींनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. या मोहिमेत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे 32, मक्तेदाराचे 40 कामगार, नगररचना अभियंते, बांधकाम विभाग अधिकारी व कर्मचारी असा सुमारे शंभर अधिकारी, कर्मचार्यांचा फौजफाटा तयार केला जाणार आहे. तसेच अतिक्रमण विभागाचे एक ट्रक, पाच ट्रॅक्टर राहणार आहे. या मोहिमेत रस्त्यावरील वाढीव शेड, पक्के बांधकाम व फलक देखील हटविले जाणार आहेत. अतिक्रमण मोहीम कोर्ट चौक ते चित्रा चौक, कोर्ट चौक ते नेहरू चौक, नेहरू चौक ते टॉवर चौक, टॉवर चौक ते घाणेकर चौक, टॉवर चौक ते चित्रा चौक, सुभाष चौक ते शिवाजी रोड, दाणाबाजार ते साने गुरुजी चौक, बळिराम पेठ या भागातील नो हॉकर्स झोन’मध्ये राबविली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद चौक ते एमआयडीसी, महाबळ रोड, गिरणा टाकी रोड, सिंधी कॉलनी ते बेंडाळे स्टॉप या रस्त्यांवर देखील ही मोहीम राबविली जाईल.