भुसावळ। शहरातील जामनेर रोडसह जळगाव रोडसह, जाम मोहल्ला, खडका रोड भागात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून त्यांचे निर्बीजकरण गेल्या अनेक वर्षांपासून झाले नसल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. गुरुवारी काही नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. पालिकेच्या दवाखान्यात अॅन्टी रेबीज दोन दिवसांपासून उपलब्ध नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
आबालवृद्धांमध्ये पसरली भीती
शहरातील जामनेर रोडसह वर्दळीच्या जळगाव रोडवर मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. रात्री-बेरात्री पायी चालणार्या पादचार्यांसह दुचाकी स्वारांच्या मागे ही मोकाट कुत्री लागून चावा घेत असल्याने पालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होती आहे.
नगरपालिकेच्या दवाखान्यात किमान शंभर अॅन्टीरेबीज लस आजघडीला उपलब्ध आहेत. पुढील आठवड्यात आणखीन पुरवठा होणार असून वर्क ऑर्डरही संबंधितास देण्यात आली आहे.
रमण भोळे, नगराध्यक्ष, भुसावळ
शहरात गुरुवारी रात्री आठ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. काहींना जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. पालिका दवाखान्यात नेहमीच अॅन्टी रेबीजचा तुटवडा असतो.
दुर्गेश ठाकूर, नगरसेवक
पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
अॅनिमल बर्थ कंट्रोल रूल्स 2001 नुसार निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. मात्र भुसावळ पालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रक्रियाच राबवली नसल्याची माहिती हाती आली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी या बाबीस दुजोराही दिला. श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी येणार्या खर्चातील 50 टक्के रक्कम भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड, चेन्नईकडून दिली जाते मात्र साधा पत्रव्यवहारही या संस्थेशी गेल्या अनेक वर्षात झालेला नाही. नागरिकांच्या जीवाविषयी पालिका प्रशासन एकूणच उदासीन असल्याचा पकार यानिमित्ताने समोर आला आहे. मोकाट कुत्र्यांचा पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणीही या निमित्ताने जोर धरत आहे.