जळगाव । शहरातील गांधी मार्केट व भिलपुरा या दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली असून याबाबत चोरट्यांविरूध्द शहर व शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधी मार्केट परिसरातील विजय कलेक्शन येथे धिरज यशवंत ठाकरे (वय-26 रा. वाल्मीक नगर) हा कामाला असून तो 30 जानेवारी रोजी नेहमी प्रमाणे सकाळी 10.30 वाजता मोटारसायकल क्रं. एमएच.19.बीएल.8426 ने दुकानावर आला आणि मोटारसायकल दुकानासमोर उभी केली.
सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आली घटना
सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास दुकानातील वॉचमनने धिरजला मोटारसायकल चोरी झाल्याची माहिती देताच त्याने गांधी मार्केट परिसरात मोटारसायकलचा शोध घेतला परंतू मोटारसायकल न मिळून आल्याने त्याला चोरी झाल्याची खात्री झाली. याबाबत आज गुरूवारी धिरज ठाकरे याने दिलेल्या फिर्यादीवरून मोटारसायकल चोरट्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत भिलपुरा परिसरात राहणारे गुलाम मोहम्मद रजवी (वय-40) यांनी 14 मार्च रोजी सकाळी भिलपुरा परिसरातील मशिदीजवळ त्यांची मोटारसायकल क्रं. एमएच.19.सीडी.9211 ही उभी केली होती. घरी आल्यानंतर काही वेळातच ते मशिदीजवळ आले. त्यावेळी त्यांना त्यांची मोटारसायकल दिसून आली नाही. परिसरात मोटारसायकलचा शोध घेवून देखील मोटारसायकल आढळून आली नाही. अखेर आज गुलाम रजवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्किंगमधून दुचाकी चोरी
जिल्हापेठ परिसरातील पारीख पार्कजवळ असलेल्या भंगाळे हॉस्पिटलजवळून 11 मार्च रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केली आहे. या प्रकरणी गुरूवारी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारूतीपेठेतील भूषण सुधाकर खैरनार याला गावाला जायचे असल्याने 11 मार्च रोजी त्याची विनाक्रमांकाची नवी दुचाकी भंगाळे हॉस्पिटलजवळ लावली. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास परत आल्यानंतर दुचाकी जागेवर नव्हती.