पुणे । रक्त हे जीवन आहे. एखाद्या रूग्णाला तातडीने रक्ताची गरज असेल आणि ते मिळाले नाही तर त्याच्या जिवाचेही बरेवाईट होऊ शकते. अशाप्रकारे रक्ताची गरज ही अतिशय अमुल्य असताना याच रक्ताचा तुटवडा शहरात जाणवू लागल्याने रूग्णाच्या नातेवाईकांच्या पायाखालील वाळू सरकत आहे. रक्तासाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे. ससूनसारख्या मोठ्या रूग्णालयातही रक्ताची टंचाई जाणवत असल्याने अनेक रूग्णांचे जीव धोक्याच्या छायेत आहेत. दररोज जेवढ रक्तपुरवठा अपेक्षित असतो तेवढेही रक्त उपलब्ध नसल्याने रूग्णालय प्रशासन आणि रूग्णांचे नातेवाईक दोघांचेही धावपळ उडताना दिसत आहे. शहरात शेकडो सामाजिक संस्था असताना रक्तदानासारखे उपक्रम राबविणार्या संस्थांची संख्या खुपच कमी असल्याचे जाणवत आहे. विशेष म्हणजे पुणे शहरात रक्तदात्यांची संख्या सर्वाधिक आहे. खासगी रक्तपेढ्यांमध्येही सर्व रक्त गटाच्या रक्ताचा मोठा तुटवडा आहे.
शहरात निर्माण झालेल्या या रक्ताच्या टंचाईबाबात रक्ताचे नाते ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राम बांगड म्हणाले, सध्या समाजकारणाची भावना कमी झाली आहे. त्यामुळे रक्तदान कमी होत आहे. नागरिकांनी जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणे आवश्यक आहे. रक्तपेढ्यांनीदेखील शिबिर आयोजित करून साठा वाढविला पाहिजे. रक्त मागण्यासाठी आलेल्या ग्राहकाला नाही असे बोलण्यापेक्षा त्यांना रक्त मिळवून देण्यासाठी रक्तपेढ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संयोजकांनी जून-जुलै महिन्यात अधिक शिबिरे आयोजित केली पाहिजेत. त्यामुळे या काळात रक्तसाठ्याची टंचाई कमी आहे. दरवर्षी उन्हाळ्यात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. रक्तपेढीत येऊन रक्तदान करणार्यांची संख्या बर्यापैकी असली, तरी उन्हाळ्यात हे प्रमाण कमी होते. तरुणांनी आपल्या मित्रांसह रक्तदान केले, तर टंचाई कमी होण्यास मदत मिळू शकते. रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदात्यांनी समोर यावे, असे आवाहन राम बांगड यांनी केले.
उन्हाळ्यात रक्तदान शिबिरेही कमी
ससून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या जिल्ह्यातूनही रुग्ण येतात. साहजिकच येथे बाराही महिने रक्ताची मोठी गरज भासते. अपघातातील जखमी, सिझेरियन प्रसूती, इतर शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना रक्ताची गरज भासते. यासाठी रुग्णालयात रक्तपेढी असून, या ठिकाणी गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाते. उन्हाळ्यात दरवर्षी रक्ताचा तुटवडा होतो. यावषीर्ही रक्तपेढीत सर्वच गटाच्या रक्ताचा तुटवडा आहे. रक्तपेढीत रक्त मिळत नसल्याने नाइलाजाने अनेक रुग्णांना खासगी रक्तपेढ्यांमधून रक्त विकत घ्यावे लागते. खासगी रक्तपेढ्यांमध्येही रक्तसाठा नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. या महिन्यात रक्तदान शिबिरेही कमी होतात. त्यामुळे साठा होत नाही. दरवर्षी जून-जुलै महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो.
राज्यातील रक्तपेढ्यांतही कमतरता
सध्या राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई आहे. मुंबई, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, अकोला या भागातून फोन येत आहेत. त्या ठिकाणी रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. पुण्यात त्या प्रमाणात रक्तदाते अधिक असल्याने या ठिकाणी रक्तासाठी चौकशी केली जाते. परंतु, सध्या पुण्यातही रक्ताचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तच नाही. मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना भटकावे लागते. रक्तदानाबाबतचा कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे रक्तदान क्षेत्रात रॅकेट तयार झाले आहे. ते केवळ पैशांसाठी काम करते. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. खरंतर एफडीएकडून नियंत्रण ठेवले पाहिजे. एखाद्या रक्तपेढीच्या परवान्याचे नूतनीकरण करताना त्यांनी योग्य रक्तसाठा ठेवण्याचे बंधन केले पाहिजे, तरच रक्ताची टंचाई जाणवणार नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.