मुस्लीम बांधवांचा उत्साह शिगेला ; जाम मोहल्ला भागात रात्री उशिरापर्यंत वर्दळ ; लाखो रुपयांची उलाढाल
भुसावळ (प्रतिनिधी)- मुस्लीम बांधवांचा मोठा सण रमजान ईद (शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यास) शनिवारी साजरी होणार असल्याने मुस्लीम बांधवामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधवाची गर्दी झाली आहे. मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची दोन दिवसांनी समाप्ती होणार आहे. ईदचा सण साजरा करण्यासाठी मुस्लीम बांधवाची बाजारपेठेत नवीन कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून बाजारपेठ गर्दीने फुलली आहे. सर्वाधिक गर्दी शहरातील जाम मोहल्ला व कापडांच्या दुकानावर दिसून येत आहे. रमजान ईदच्या शुभेच्छा देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले असून मुस्लीम बांधवामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रमजान ईदचा सण उत्साहाने व शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
ईदगाह सज्ज
पवित्र रमजान ईदची सामूहिक नमाज पठण करण्यासाठी खडका रोडवरील ईदगाहची रंगरगोटी व परीसरातील स्वच्छता करण्यात आली आहे. ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यासाठी येणार्या मुस्लीम बांधवासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून एकाच वेळी किमान 25 हजार मुस्लीमबांधव नमाज पठण करतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींची राहणार हजेरी
मुस्लीम बांधवाना पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व अधिकारी ईदगाह मैदानावर हजेरी लावणार आहेत. पोलीस विभागाच्या माध्यमातून ईदगाह मैदानावर जाणार्या मुस्लीम बांधवाची गर्दी पाहता खडका चौफुलीवर बंदोबस्त लावला जाणार आहे.