शहरात रस्ते खोदाईचा महापालिकेने लावला पुन्हा सपाटा

0

सिमेंटचे रस्ते आणि पाण्याच्या लाइनसाठी रस्ते खोदाई; नागरिकांना मनस्ताप, व्यवसायावरही होतो परिणाम

पुणे : महापालिका प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे सिमेंटचे रस्ते आणि पाण्याच्या लाइनसाठी रस्ते खोदाईला सुरुवात झाली आहे. असे असले, तरी या कामासाठी लागणार्‍या वेळेमुळे दुकानदार आणि नागरिकांच्या जीव मेटाकुटीला आला आहे. ड्रेनेजलाइन टाकणे आणि अन्य कामांसाठी केली जाणार्‍या खोदाईमुळे रस्ते बंद ठेवले जात आहेत. शहरात रस्ते खोदाईचा महापालिकेने सपाटा लावल्यामुळे नागरिकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या रस्त्यांवर वाहने तर सोडाच, परंतु चालत जाणेही शक्य नसल्याने लोकांनी या रस्त्यावरून जाणे टाळले आहे. त्याचाच परिणाम येथील व्यवसायांवर झाला असून रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी या व्यापार्‍यांकडून केली जात आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून मात्र कोणीही बोलायला तयार नाही.

काम अर्धवट सोडण्याचे प्रकार वाढले

रस्ते खोदाईच्या कामात होणार्‍या दिरंगाईला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार आहे, अशी ओरडही नागरिकांमधून केली जात आहे. नगरसेवकांनी ‘मर्जी’तल्या ठेकेदारांना काम देण्याला प्रशासनाला भाग पाडले आहे आणि प्रशासन त्यांच्याकडून ही कामे वेळेत पूर्ण करून घेऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर एकेका ठेकेदाराने अनेक कामे घेऊन ठेवली आहेत. वर्क ऑर्डर दिल्याने नेमून दिलेल्या ठिकाणी काम सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे थोडे-थोडे काम करून ते अर्धवट सोडण्याचा प्रकारही या ठेकेदारांकडून केला जात आहे. त्याचाच नाहक त्रास नागरिकांना होत आहे.

ठेकेदारांकडून दंड वसूल करावा

रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर वेळेत काम पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी काही स्वयंसेवी संस्थांनी पूर्वीपासूनच केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. कामाचा दर्जा जसा तपासला जातो, तसे ते वेळेत पूर्ण होते की नाही याचे परीक्षण करण्याची यंत्रणा महापालिकेकडे असणे आणि त्याची कडकपणे अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने ते होत नाही.