शहरात रेकॉर्डब्रेक चोरीची नोंद; तब्बल एक कोटीचा डाका

0

क्ती-शक्ती चौकातील बंद फ्लॅट फोडून 80 लाखांचे दागिणे, 17 लाखांची रक्कम लंपास
सोसायटीचा सुरक्षारक्षक कैद झाला सीसीटीव्हीत

पिंपरी-चिंचवड : चोर्‍या, हाणामार्‍या, तोडफोड, अपहरण, लुट, खुन…असे अनेक प्रकार शहराला नवीन नाही. मात्र, शनिवारी शहराची ‘श्रीमंती’ दर्शविणारी एका रेकॉर्डब्रेक चोरी झाली. आलिशान बंगल्यातील दोन बंद सदनिका फोडून चोरट्याने तब्बल एक कोटीचा डाका घातला. शहराच्या आजवरच्या पोलीस डायरीत सर्वात मोठी म्हणून या चोरीची नोंद झाली. गेल्या अठरा तासात झालेल्या तपासात 80 लाखांचे हिरा-मोती-सोन्याचे दागिणे आणि रोख 17 लाख 20 हजार चोरीस गेल्याचे समोर आहे. मात्र, ही रक्कम अजून वाढण्याची शक्यता पोलीस अधिकार्‍यांनी वर्तविली आहे.

हिर्‍यामोतीच्या हारांसह दागिण्यांचा समावेश
ही रेकॉर्डब्रेक चोरी निगडी परिसरातील भक्ती-शक्ती चौकाजवळच्या पंचवटी या आलिशान तीन मजली बंगल्यात झाली. विनोद राजकुमार आगरवाल (वय 48, रा. सेक्टर नंबर 23, पंचवटी बांगला, भक्ती-शक्ती चौक, निगडी) या मालकांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आगरवाल कुटुंबीय घरगुती कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. शनिवारी (दि 16) रात्री घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्याने विनोद यांची तिसर्‍या मजल्यावरील सदनिका आणि त्यांचा भाऊ संदीप अगरवाल यांची दुसर्‍या मजल्यावरील सदनिकेचे दरवाजा असलेले कुलूप तोडले. यानंतर वॅार्डरोब आणि शयनगृहामधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप, हिर्‍यांचा हार व रोख रक्कम असा एकूण 97 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोर लंपास झाला. रविवारी सकाळी कुटुंबीय आल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला.

सहा महिन्यांपूर्वी नेमला होता रखवालदार
चोरीची माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेल्या पोलिसांना रक्कम ऐकूनच भोवळ येण्याची वेळ आली. कारण इतकी मोठी चोरी शहराच्या इतिहासात झालेली नव्हती. मात्र, बंगला मालकांनी पुरविलेली तपशिलवार माहिती आणि त्याची संगती घालता घालता पुरेवाट झाली. यानंतर बंगला आवार व प्रत्येकमजल्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज पोलिसांनी पाहिले. यामध्ये बंगल्याचा रखवालदार गोविंद कालु परियार (वय 35, रा. कलाली, लमकी, नेपाळ) याचा चेहरा व हालचाली स्पष्टपणे टिपल्या गेल्या आहेत. त्याला सहा महिन्यापूर्वीच कामावर ठेवले होते. सध्या तो फरार आहे. पोलिसांनी त्याच्यासह साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रोपीच्या मागावर पोलीस
पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. सर्व तपास पथके घटनास्थळी दाखल झाली असून आरोपीला शोधण्याचे काम सुरू आहे.