शहरात विविध संस्थांतर्फे बालदिन आनंद व उत्साहात साजरा

0

2000 विद्यार्थी सहभागी

पुणे । वडकी येथील नूतन विद्यालय, उरुळी देवाची येथील समता विद्यालय व आदर्श हायस्कूल या शाळांमध्ये बालदिनानिमित्त राउंड टेबल इंडिया पुणे चॅप्टर 15तर्फे ‘तारे जमीन पर…’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तिन्ही शाळांतील पाचवी ते 10 वीचे सुमारे 2000 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. यावेळी देवेश जाटिया, प्रोमित सूद, कपिल शहा, हर्निश ठक्कर, अभिषेक मालपाणी, मुख्याध्यापक प्रा. साखरे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

‘त्यांचा’ थाटात वाढदिवस
गुरुवार पेठेतील वीर शिवराज मंडळ, बालकल्याणकारी सेवा संस्था व क्रांतीज्योती महिला विकास संस्था यांच्यावतीने बालदिनाचे औचित्य साधून देहविक्री करणार्‍या महिलांच्या मुलांसाठी काम करणार्‍या स्वाधार, मोहोर संस्थेतील मुलांनी केक कापून बालदिनाबरोबरच आपल्या मित्रमंडळींचा वाढदिवसदेखील जल्लोषात साजरा केला. पंडित नेहरू यांना रंगावलीतून आदरांजली वाहण्यात आली. बाळकृष्ण नेहरकर यांनी विविध खेळांतून मुलांचे मनोरंजन केले. स्वाधार मोहोर संस्थेत आयोजित या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष किरण सोनिवाल, बालकल्याणकारी सेवा संस्थेचे मोहित झांजले, क्रांतीज्योती महिला विकास संस्थेच्या सोहनी डांगे, स्वाधार मोहोरच्या संजीवनी हिंगणे, चैतन्य सिन्नरकर, सचिन चव्हाण, मंगेश शहाणे, अक्षय पानसरे, तुषार शेलार आदी उपस्थित होते.

शालेय साहित्याचे वाटप
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालदिनानिमित्त रेन्बो संस्था व लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना शहराध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.

गाणी-गोष्टी नाटुकल्यांनी भरले रंग
भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात नाचू, खेळू… गप्पा मारू, खूप गम्मत करू, गाणी-गोष्टी नाटुकल्यांनी, रंग मजेचे भरू’ या संकल्पना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. धनंजय सरदेशपांडे यांनी बालगोपाळांचे रंजन केले. अचानक प्रेक्षकांतून एन्ट्री घेऊन त्यांनी एक छोटे नाटुकले सादर केले. त्यानंतर बर्‍याच अनोख्या गाण्यांनी मुलांना मोहिनी घातली. या गाण्यात विमान, हत्ती, उंट, डायनासोर, कुत्रा असे अनेक प्राणी त्यांना भेटले. माधुरी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सभागृहात फुगे, माळांनी सुशोभन केले होते. खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. आशा होनवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.