शहरात शुक्रवारपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

0

पिपरी-चिंचवड : पुणे फिल्म फाऊंडेशन, महाराष्ट्र शासन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 13 ते 18 जानेवारी दरम्यान 16 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध भाषेतील व देश-विदेशातील चित्रपटांसह एकूण 46 चित्रपट दाखविले जाणार आहेत.चिंचवड येथील कार्निव्हल सिनेमागृहात (बिग बझारच्यावर) सायंकाळी साडेसहाला ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रणधीर कपूर, ऋषी कपूर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष जब्बार पटेल उपस्थित असणार आहेत.

उद्घाटनापूर्वी सायंकाळी पाच वाजता पुण्यातील नामवंत गायक विवेक पांडे, गायीका कोमल, निवेदक घनशाम अग्रवाल आणि संगीत संजोयन चिंतन मोढा यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पुन्हा उर्वरित सुमधुर गीतांचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर सायलेंट मिस्ट व सिक्रेट इनग्रिडीएन्ट हे जागतिक स्तरावरील प्रसिद्ध चित्रपट दाखविले जाणार आहे.

महापालिकेचा 15 लाखांचा खर्च
महोत्सवात 22 देशातील चित्रपट दाखविले जाणार आहेत. तर, मराठीतील प्रसिद्ध न झालेले ’व्हिडीओ पार्लर’, ’पळशीची पेटी’, ’मंत्र’, ’फेज4’ आणि सर्वनाम हे पाच चित्रपट दाखविले जाणार आहेत. प्रदर्शनात एकून 46 चित्रपट दाखविले जाणार असून गतवर्षीपेक्षा यंदा सहा चित्रपट जास्त दाखविले जाणार आहेत. या महोत्सवासाठी पालिका तीन लाख रुपये अनुदान आणि चित्रपटग्रहाचा सर्व खर्च करते. त्यासाठी एकूण 15 लाख रुपये खर्च पालिका करत आहे. यंदाचे हे शहरातील महोत्सवाचे चौथे वर्ष आहे.

सर्वांसाठी खुला प्रवेश
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहरवासियांसाठी पर्वणी आहे. यामुळे चित्रपटसुष्टीत काम करु इच्छिणार्‍या शहरातील तरुणांना याचा मोठा फायदा होणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खूला असणार असून याचा शहरातील नागरिकांनी मोठ्या लाभ घेण्याचे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका भीमाबाई फुगे, आशा शेंडगे, अश्‍विनी जाधव, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे समर नखाते आदी उपस्थित होते.