महावितरणकडून स्थलांतराचा 4 कोटी 71 लाखांचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे रवाना
जळगाव (किशोर पाटील)- समांतर रस्त्यांसाठी अडसर ठरणार्या वीजखांब स्थलांतरणाचा 4 कोटी 71 लाख रुपयांचा प्रस्ताव अखेर महावितरण परिमंडळ कार्यालयाने दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवाला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर समांतर रस्त्यांमधील अडथळा ठरणारे जुने 135 वीजखांब काढून नवीन ठिकाणी 140 पोल लागणार आहेत. दरम्यान यामुळे समांतर रस्त्याच्या कामांना गती मिळणार आहे.
समांतर रस्त्यांबाबत समांतर रस्ते कृति समितीतर्फे आंदोलने, निवेदन करुन शासनासह जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. डीपीआरला मंजुरी मिळाल्यावर संबंधित समांतर रस्त्यांमधील अडथळा वीजखांब स्थलांतरणासाठी निधी नसल्याने ते हटविता येणार नसल्याची समस्या उभी राहिली होती. त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने सर्व विभागांची संयुक्तिक बैठक घेवून जिल्हा नियेाजन समितीने यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यावरुन जिल्हाधिकार्यांनी महावितरण कार्यालयाला सदरच्या कामाचे अंदाजपत्रक तसेच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.
असा आहे महावितरणचा प्रस्ताव
कालिंकामाता मंदिर ते खोटेनगर अशा समांतर रस्त्यात 8.22 किलोमीटर 33 केव्ही लाईन, 5.3 किमी 11 केव्ही लाईन, 3.41 किमी 11 केव्ही केबल, 100 केव्हीचे 32 ट्रान्सफार्मर, 200 केव्हीचे 3 ट्रान्सफॉर्मर, थ्री फेज एल टी लाईन 4.53 किलोमीटर अशी जोडणी करण्यात येणार आहे. यात एका खांबावर दोन सर्किट राहणार असून 34 केव्हीचे 140 पोल त्याला आधार म्हणून 16 पोल तसेच 11 केव्हीचे 90 वीजखांब लागणार आहे. यात जुने 33 केव्हीचे 135 खांब काढण्यात येणार असून प्रोजेक्ट रिपोर्ट कॉस्ट म्हणजे डीपीआर कॉस्ट 4 कोटी 71 लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती प्रशासन विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी भालशंकर यांनी जनशक्तीची बोलतांना दिली.
मंजुरीनंतर होणार कामाला सुरुवात
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर तसेच प्रस्ताव अंतिम झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणकडून 1.3 नॉर्म्याटीव्ह चार्जेस म्हणजे सुपरव्हिजन चार्जेस या योजनेनुसार संबंधित खांब स्थलांतरणासह जोडणीचे काम होणार असल्याचेही कार्यकारी अभियंता भालशंकर यांनी सांगितले.