प्रजातपनगर, इंद्रप्रस्थनगर, राधाकृष्ण नगरातील घर फोडले ः एका घटनेत सीसीटीव्हीत संशयित कैद
जळगाव- शहरात चोरट्यांनी सलग तिसर्या दिवशी शिवाजीनगर परिसरातील इंद्रप्रस्थ नगर, राधाकृष्ण नगर तसेच प्रजापत नगरातील घरफोडी करुन सुपर हॅटट्रीक साधली आहे. शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच असून एकही दिवस चोरीच्या घटनांशिवाय खाली जात नसल्याचे चित्र आहे. पोलीस आहेत की नाही अशी शंका आता उपस्थित होवू लागली आहे. राधाकृष्ण नगरातील घटनेत सहा संशयित सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून याच सहा जणांनी शहरात धुमाकूळ घातल्याची अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यांपर्यंत संशयित पोहचण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
इंद्रप्रस्थ नगराततून 50 हजाराचा एैवज लांबविला
शिवाजीनगर परिसरातील इंद्रप्रस्थ नगरात मनोज पुंडलिक तिळवणे हे आई सिंधुबाई पत्नी मंगला, मुले सुशांत व पियुष यांच्यासह वास्तव्यास आहेत. ते बांभोरी येथील जैन इरिगेशन या कंपनीत ऑपरेटर म्हणून नोकरीला आहे. 17 रोजी सर्व कुटुंबिय रक्षाबंधननिमित्ताने बर्हाणपूर येथे गेले. सोमवारी सकाळी ते 9.30 वाजेच्या सुमारास गावाहून परतले. मेन लोखंडी गेटचे कुलूप उघडल्यावर आती दरवाजांचे कोयंडा कापलेला दिसला. घरात पाहणी केली असता कपाटातील तसेच पलंगातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. चोरट्यांनी गेट वरुन उडी मारुन प्रवेश करत घरातून अडीच तोळे सोने व 40 हजार रुपये रोख असा एैवज लांबविला. नवीन घर घेण्यासाठी पैसे जमविले होते, त्यातच कंपनीत चार ते पाच महिने पगार होत नसल्याने या घटनेमुळे आर्थिक संकट ओढवले असल्याचे मनोज तिळवणे यांनी सांगितले.
अंगणात शौच करुन केला पोबारा
तिळवणे यांच्या घरी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी अंगणात शौच केली. यानतर पोबारा केला. दरम्यान कुंपनात एक प्लॅस्टिकची बॅटरी सापडली असून ती चोरट्यांची असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या परिसरात महापालिकेचे पथदिवे बंद असल्याने चोरट्यांचा चांगलेच फावत असून पथदिवे सुरु करावेत अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली.
प्रजापत नगरात व्यवस्थापकाचे घर फोडले
ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापतनगरातील सुनंदिनी पार्कमध्ये राहणारे धर्मेश भोजराज पांडव हे ऑटो आयकॉनमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. पांडव हे पत्नी कोमल, मुलगा हर्षल व मुलगी हेमा यांच्यासह राहतात. पांडव यांचे आई-वडील यावल तालुक्यातील म्हैसवाडी गावी राहतात. दि.16 रोजी रात्री त्यांच्या आई प्रभावती यांचे निधन झाल्याने शनिवारी सकाळी पांडव परिवारासह त्याठिकाणी गेले. चोरट्यांनी घरी कुणीही नसल्याची संधी साधत रात्रीच्या सुमारास घराच्या कंपाऊडमध्ये प्रवेश केला. खिडकीवर चढत चोरट्यांनी बाहेरील लाईट फोडला. त्यानंतर मुख्य दरवाज्याचा कडी कोंडा कापत आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट, लाकडी कपाट फोडून 1 हजार रूपये रोख लंपास केली. कपाटात गॅस हंडी घेण्यासाठी गॅसच्या पुस्तकात 500 रूपये ठेवलेले होते. सुदैवाने चोरट्यांच्या हाती ते पैसे लागले नाही.
गॅस हंडीवाल्याच्या लक्षात आला प्रकार
सोमवारी सकाळी 10 वाजता पांडव यांच्याकडे गॅस हंडी पोहचविण्यासाठी एजन्सीचा कर्मचारी आला होता. त्यावेळी समोर राहणार्या एका महिलेने पांडव गावी गेले असल्याचे सांगितले. परंतु गॅस एजन्सीच्या कर्मचार्याने घराचा दरवाजा उघडा असल्याचे निर्दशनास आणून दिले. त्यावेळी घरात जावून पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. पांडव यांना याबाबत कळविण्यात आले असून ते आईच्या अंत्यविधीनंतरची सर्व कार्य आटोपल्यानंतर जळगावला येणार आहे.