नव्या वर्षात पहिल्याच आठवड्यात तीन जणांचा बळी
पुणे : शहरात मागील दहा दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्यामुळे ‘स्वाइन फ्लू’चा संसर्ग वाढला आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात संसर्ग वाढल्यामुळे तिघांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामध्ये आठ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
धायरी येथील आठ वर्षांच्या एका मुलाला स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्याला जन्मतः थॅलेसेमियाचा आजार होता. त्याचे बोन मॅरो ट्रान्सप्लांटही झाले आहे. थॅलेसेमियाच्या आजारामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे प्रकृती खालावली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कोंढव्यातील एका 46 वर्षीय महिलेला ताप, सर्दी, खोकला, थंडी अशी लक्षणे दिसत होती. त्यानंतर श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे तात्पुरते उपचार घेतले. परंतु, प्रकृती खालावत असल्याने त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर राहाता (शिर्डी) येथील आणखी स्वाइन फ्लू झालेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
गेल्या वर्षात 62 जणांचा मृत्यू
नव्या वर्षात ‘स्वाइन फ्लू’ने तीन जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. हे तीनही मृत्यू जानेवारी महिन्यातील पंधरवड्यातील आहेत. गेल्या वर्षात 62 जणांचा मृत्यू झाला होता. तर 592 जणांना लागण झाली होती. या वर्षात आतापर्यंत 47 हजार 382 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी चार जणांना लागण झाल्याचे निदान झाले आहे.
आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारी महिन्याच्या गेल्या दहा दिवसांत चांगली थंडी होती. थंडीमुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक हवामान असते. त्यात तापमान बदलत गेले. त्याचा परिणाम म्हणून स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रुमाल किंवा मास्क लावावे. सर्दी, ताप, खोकला लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असे आवाहन सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी केले आहे.