शहरात स्वाईन फ्लू संदर्भात जनजागृती करा ;अमर साबळेची सूचना

0

पिंपरी– चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात स्वाईन फ्लूसंदर्भात घेण्यात आलेल्या विभागस्तरीय तातडीच्या बैठकीत खासदार अमर साबळे यांनी या सूचना दिल्या. खासदार साबळे म्हणाले, “स्वाईन फ्लू हा आजार गंभीर स्वरूपाचा असला तरी त्यावर योग्य वेळेत उपचार केल्यास तो निश्चित बरा होतो. एच 1 एन 1 या विषाणूमुळे हा आजार पसरतो. साधा फ्लू व स्वाईन फ्लू यांची लक्षणे एकसारखीच असल्याने स्वाईन फ्लू आजाराची त्वरित निदान करून त्यावर वेळीच उपचार केले जात नाही. त्यामुळे हा आजार वाढून नियंत्रणात आणण्यास अवघड होते आणि अशा रूग्णांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. सार्वजनिक ठिकाणी जसे शाळा, महाविद्यालय, कंपनी, कार्यालय यामध्ये स्वाईन फ्लू आजाराबाबत जनजागृती करावी” असे निर्देश त्यांनी दिले.

नागरिकांनी ताप येणे, घसा खवखवणे, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी अशा स्वरूपाची काही लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे. तसेच वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हाथ धुवावेत, हस्तांदोलन अथवा आलिंगन टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, शिंकताना व खोकताना रूमालाचा वापर करावा, वारंवार नाकाला व तोंडाला हात लावू नये. सर्दी खोकला असलेल्या नागरिकांनी त्वरित डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास मृत्यूचा धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: गर्भवती महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांनी या आजाराबाबत विशेष काळजी घ्यावी. पौष्टिक आहार व भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी, अशा स्वरूपाची काळजी घेतल्यास वेळेतच स्वाईन फ्लू या आजारावर प्रतिबंध घालणे सोपे होईल.

शासकीय व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी स्वाईन फ्लू वा साधा फ्लू यांच्या लक्षणांमध्ये साम्य असल्यामुळे स्वाईन फ्लूच्या लक्षणांना प्राधान्याने ओळखून त्यावर त्वरित उपचार करावा. स्वाईन फ्लू उपचारात व निदानात विलंब केल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे निर्देश खासदार साबळे यांनी दिले.

यावेळी आयुक्त श्रावण हार्डीकर, प्रवीण आष्टीकर, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय, उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेवक माऊली थोरात, नगरसेवक केशव घोळवे, महिला मोर्चा अध्यक्ष शैला मोलक, डॉ. देशमुख यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.