शहरात हिंडतायेत ‘डमी’ महापौर

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आमदारांच्या वाहनावर लावण्यात येणारे ‘विधानसभा सदस्य’ हे स्टीकर शहरातील अनेक वाहनचालकांच्या गाडीवर लावलेले दिसून येत आहे. हे स्टीकर लावणे हे बेकायदेशीर काम आहे. आता महापौर नितीन काळजे यांचे नाव दुचाकीच्या नंबरप्लेटवर टाकले जात असल्याचे आज (शनिवारी) समोर आले आहे. नंबर प्लेटवर महापौर नितीन काळजे यांचे नाव टाकलेल्या दुचाकीवरुन जाणारे तरुण ‘कॅमेर्‍यात’ कैद झाले आहेत.

पदाधिकारी नसताना खासगी वाहनांवर अशी नावे टाकणे गुन्हा आहे. परंतु, शहरात अनेक वाहनांवर ‘विधानसभा सदस्य’ हे स्टीकर लावून फिरताना दिसतात. अगदी अल्टोपासून फॉर्च्युनरसारख्या वाहनांवर हे स्टीकर दिसून येत असून औद्योगिकनगरीतील तिनही विधानसभा मतदार संघात अशा ‘डमी’ आमदारांची संख्या अधिक आहे. त्यातच आता महापौर नितीन काळजे यांचे नाव, महापौर असे दुचाकीच्या नंबरप्लेटवर टाकले जात आहे. त्यामुळे अशा दुचाकीवर पोलीस आता काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.