माजी नगरसेवक मारुती भापकर यांची सांस्कृतिक मंत्र्यांकडे मागणी
पिंपरी-चिंचवड : संतश्रेष्ठ श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पावन स्पर्श लाभलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या मोशी परिसरात यंदा ’सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल’ होणार आहे. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असणारा हा फेस्टिव्हल रद्द करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. या विषयाबाबत त्यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठवले आहे.
शहराचा नावलौकिक खराब होईल
औद्योगिकनगरी, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटीहब अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात देशाच्या कानाकोपर्यातील लोक वास्तव्यास आहेत. शहराला अध्यात्माचा वारसा आहे. मात्र, सनबर्न फेस्टिव्हलमध्ये तरुणाई मद्यधुंद होऊन, डिस्को लाईट आणि डीजेच्या तालावर, तोकडे कपडे परिधान करून थिरकते. म्हणून तरुणांकडून या फेस्टिव्हलचे नेहमीच स्वागत केले जाते. मात्र, हा फेस्टिव्हल त्वरित रद्द करण्यात आला पाहिजे. या फेस्टिव्हलची सोशल मीडियावर जोरात जाहिरात सुरू असून, हा फेस्टिव्हल रद्द झाला नाही तर शहराच्या नावलौकिक खराब होईल, असे भापकर यांनी पत्रात नमूद केले आहे.