शहरात 17 डिसेंबरला ई-वेस्ट संकलन महाअभियान

0

पिंपरी-चिंचवड : शहरात ई-कचर्‍याची वाढती समस्या व त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेत महापालिकेच्या वतीने शहरात ई-वेस्ट संकलन महाअभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान 17 डिसेंबरला शहरातील विविध 14 ठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत राबविण्यात येणार आहे. महापालिकेकडून ई-कचरा गोळा करण्याकडे दुर्लक्ष केले जात असून त्याचे घातक परिणाम शहराच्या आरोग्यावर होत आहेत.

आयुक्तांसोबत बैठक
ही गंभीर बाब लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धन समितीने (ईसीए) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत दोन बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये हे अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले. गुरुवारी (दि. 23) भोसरी येथील ई प्रभाग मुख्य कार्यालयात बैठक झाली. यावेळी ई क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा भीमा फुगे, पर्यावरण तज्ज्ञ विकास पाटील, इसिएचे पुरुषोत्तम पिंपळे, प्रभाकर मेरुकर, दत्तात्रेय कुमठेकर, मनपा आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, कमिन्स इंडिया कंपनीचे पदाधिकारी संपत खैरे, नितीन साबळे, रणजीत भगत, विकास आंबले आदी उपस्थित होते.

जादा कचरा देणार्‍यांना बक्षीस
प्रसंगी ई प्रभागातील हौसिंग सोसायट्याचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांना ई-वेस्ट संकलन महाअभियानाबाबत सविस्तर माहिती व महाअभियानाचे स्वरूप स्पष्ट करताना महाअभियान प्रमुख विकास पाटील यांनी ई-वेस्टचे मानवी आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याची माहिती दिली. शहरात साठून राहिलेले ई-वेस्ट भंगार साहित्य खरेदी करणारे हातगाडीवाले यांना न देता ते शास्त्रीय पद्धतीने विघटन करणा-या यंत्रणांना दिले जावे याचे जनजागरण करण्यात आले. या अभियानांतर्गत शहरात एकूण 200 ई-वेस्ट संकलन केंद्र उभारली जाणार आहेत. या सर्व केंद्रांवर महाविद्यालयीन विद्यार्थी मदत व जागृती करण्यासाठी नेमण्यात येणार आहेत. ज्या वसाहतींकडून शंभर किलोपेक्षा अधिक ई-कचरा देण्यात येईल, अशा वसाहतींचा ईसीएकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.