भुसावळ । तालुका विधीसेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी शहरातील अतिरिक्त सत्र न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 183 खटल्यांचा निपटारा झाला तर 50 लाखांवर तडजोड रक्कम प्राप्त झाली. एकूण चार पॅनलमध्ये लोकन्यायालयाचे कामकाज चालले. जिल्हा न्यायाधीश वर्ग-1 एस.पी.डोरले यांच्या न्यायालयात सेशन कोर्ट व दावा दाखल पूर्वची सुमारे 500 प्रकरणे ठेवण्यात आली. पंच म्हणून अॅड.शोभा पाटील व अॅड.विजय तायडे यांनी काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश आर.आर.भागवत (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात दिवाणी वरिष्ठ स्तरावरील खटले चालवण्यात आले. पंच म्हणून अॅड.डी.पी.खैरनार व अॅड.जया झोरे यांनी कामकाज पाहिले. तिसरे सहदिवाणी न्यायाधीश पी.ए.पाटील यांच्या न्यायालयात म्युन्सीपल अपिल व नगरपालिका संबंधीत खटले चालवण्यात आले. पंच म्हणून अॅड.संगीता चंदन व अॅड.राजेश उपाध्याय यांनी काम पाहिले. दुसरे सहन्यायाधीश एम.एम.बवरे (कनिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात दिवाणी, फौजदारी व कनिष्ठ स्तर दाव्यांचा निपटारा करण्यात आला. पंच म्हणून अॅड.भुपेश बाविस्कर व अॅड.नीता पाटील यांनी कामकाज पाहिले.
843 खटल्यांचे कामकाज
तालुका विधी सेवा प्राधीकरणातर्फे आयोजित लोकन्यायालयात दावा दाखलचे 16 खटले न्यायालयापुढे सुनावणीसाठी आले. या सर्व प्रकरणांचा निपटारा होऊन 5 लाख 69 हजार 330 रुपयांची तडजोडीअंती रक्कम प्राप्त झाली तर अन्य 827 दाव्यांमध्ये 167 प्रकरणांचा निपटारा करण्यात यश आले. यात 44 लाख 97 हजार 540 रुपयांची रक्कम तडजोडीअंती प्राप्त झाली.
पक्षकारांचा प्रतिसाद
विविध कारणान्वये न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांमध्ये वर्षानुवर्षे निपटारा न झाल्याने लोकन्यायालयाच्या माध्यमातून या प्रकरणांचा निपटारा होत असल्याने शनिवारी पक्षकारांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे चित्र होते.
लोकन्यायालयासाठी यांनी घेतले परीश्रम
अतिरीक्त सत्र न्यायालयात शनिवारी झालेल्या लोकन्यायालयासाठी किशोर एस.पिंगाणे, एल.एल.तेलंग, डी.टी.वाणी, पी.जी.नगरकर, एस.जी.तायडे, योगेश बाविस्कर, व्ही.एम.चौधरी, डी.एम.कुळकर्णी व अन्य कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
यांनीही घडवली तडजोड
लोकन्यायालयात दाव्यांची यशस्वी तडजोड घडवून आणण्यासाठी न्या.पी.आर.क्षित्रे, न्या.बी.डी.पवार, न्या.पी.बी.वराडे, न्या.एस.एल.वैद्य, न्या.राहुल थोरात, न्या.तौर, न्या.चिद्रे, न्या.सुल आदींनी वैयक्तिक लक्ष घालून पक्षकारांच्या प्रकरणात तडजोड घडवून येण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली. वर्षानुवर्षे न्यायालयात खटल्यांचे प्रमाण वाढत असल्याने न्याय यंत्रणेवरही ताण वाढला असतांना लोकन्यायालयात दावा दाखल होण्याआधीही पक्षकाराला माहिती मिळाल्याने दाव्यांचा निपटारा झाला.